ओढणी येथे गुरू भंडारा महोत्सव उत्साहात
अभिषेक, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन व संगीत भजनाने भक्तिमय वातावरण
पेण, ता. ११ (बातमीदार) : ओढणी येथील सद्गुरु भंडारा मंडळाच्या वतीने सोमवारी (ता. ९) गुरू भंडारा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय झाला होता.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता अभिषेक व आरतीने झाली. त्यानंतर सकाळी १० वाजता ज्ञानेश्वरीच्या नवव्या आणि बाराव्या अध्यायाचे वाचन करण्यात आले. दुपारी २ वाजता ह.भ.प. घनश्याम महाराज (मळेगाव) आणि म. बंटी महाराज (ओढणी) यांनी उपस्थित भाविकांना प्रवचनातून आध्यात्मिक मार्गदर्शन केले.
संध्याकाळी साडेपाच वाजता सद्गुरु हरिपाठ मंडळ आणि ज्ञानेश्वरी हरिपाठ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हरिपाठ सादर करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता ह.भ.प. रामदास महाराज यांचे वारकरी कीर्तन झाले. या कीर्तनासाठी ज्ञानराज पाटील (बळवली) यांनी मृदंग साथ दिली, तर निवृत्ती पाटील यांनी गायन केले.
रात्री ९ वाजता रायगड भूषण दत्तात्रय पाटील यांच्या संगीत भजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या महोत्सवाला परिसरातील मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली.