दिव्यांग लाभार्थ्यांनी आधार संलग्नीकरण तातडीने करावे : तहसीलदारांचे आवाहन
विक्रमगड, ता. १२ (बातमीदार) : दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात शासनाने वाढ केल्यानंतर लाभ थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी युडीआयडी कार्ड व आधार संलग्नीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तातडीने सादर करावीत, असे आवाहन विक्रमगडचे तहसीलदार मयूर चव्हाण यांनी केले आहे.
शासन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात एक हजार रुपयांनी वाढ करण्यात आली असून, आता दरमहा दोन हजार पाचशे रुपये अनुदान डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी लाभार्थ्यांची माहिती युडीआयडी (विशिष्ट दिव्यांग ओळखपत्र) पोर्टलवर अद्ययावत असणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दिव्यांग कल्याण विभागाच्या निर्देशानुसार नुकत्याच आयोजित आढावा बैठकीत तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील २५० तसेच श्रावणबाळ योजनेतील २० लाभार्थ्यांचे युडीआयडी व आधार संलग्नीकरण अद्याप पूर्ण झाले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांची माहिती डीबीटी पोर्टलवर अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
लाभापासून वंचित राहू नये, यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले युडीआयडी कार्ड, आधार क्रमांक व बँक पासबुकच्या झेरॉक्स प्रतींसह संबंधित गावातील तलाठी कार्यालय किंवा विक्रमगड तहसील कार्यालयात २० मार्च २०२६ पूर्वी कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच युडीआयडी पोर्टलवर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणेही आवश्यक असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
दरम्यान, शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ वेळेत मिळावा यासाठी सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांनी प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार मयुर चव्हाण यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.