नायगाव बीडीडीवासीयांना मिळणार हक्काचे घर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चावीवाटप
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : घराच्या प्रतीक्षेत असलेल्या नायगाव बीडीडीवासीयांना दिलासा मिळणार आहे. पुनर्विकास प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये ८६४ घरे बांधून तयार झाली असून सोमवारी (ता. १६) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संबंधितांना चावीवाटप केले जाणार आहे.
म्हाडाकडून बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. त्यानुसार वरळी बीडीडी चाळीतील सुमारे ५५० रहिवाशांना म्हाडाने सुसज्ज घरे दिली आहेत. तर नायगाव बीडीडी चाळीतील रहिवाशांना पहिल्या टप्प्यात ८६४ रहिवाशांना घरांचा ताबा दिला जाणार आहे. त्यानुसार नोव्हेंबरमध्ये ही घरे असलेल्या इमारतींचे काम पूर्ण झाले असून भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे; मात्र निवडणूक आचारसंहिता असल्याने घरांच्या वितरणाला विलंब झाला आहे. दरम्यान, म्हाडाने आता संबंधित रहिवाशांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चावीवाटप करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार सोमवारी सकाळी १० वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पाॅइंट येथे हा चावीवाटपाचा कार्यक्रम होणार आहे.
पाच इमारतींत ८६४ सदनिका
नायगाव बीडीडी येथील ४२ चाळींचा पुनर्विकास करून ३,३४४ रहिवाशांचे पुनर्वसन २३ मजल्यांच्या २० पुनर्वसन इमारतीमध्ये करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आठ तर दुसऱ्या टप्प्यात १२ पुनर्वसन इमारती उभारण्यात येणार आहेत. पुनर्वसन इमारत क्रमांक आठमधील टाॅवर क्रमांक चार ते आठ या पाच इमारतींचे काम पूर्ण केले असून ८६४ रहिवाशांना घरांचा ताबा दिला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.