तरुणांची तस्करी करणाऱ्याचा जामीन अर्ज फेटाळला
गुन्हा गंभीर असल्याचे निरीक्षण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : परदेशात आकर्षक नोकऱ्यांचे तरुणांना प्रलोभन दाखवून त्यांची तस्करी करण्याचा तसेच त्यांना तिथे बेकायदा सायबर फसवणुकीच्या कृत्यांमध्ये सहभागी होण्यास भाग पाडल्याचा आरोप असलेल्या याचिकाकर्त्याचा जामीन अर्ज नुकताच उच्च न्यायालयाने फेटाळून लावला.
हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याचे न्या. अजय गडकरी आणि एस. सी. चांडक यांच्या खंडपीठाने आदेशात नमूद केले. आरोपीविरुद्ध प्रथमदर्शनी सबळ पुरावे आहेत. त्यांनी भारतातील बेरोजगार, सुशिक्षित तरुणांना परदेशी कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांची तस्करी केली. जर त्याला जामिनावर मुक्त केले, तो पळून जाण्याची आणि पुराव्यांशी छेडछाड करण्याची शक्यता नाकरता येत नाही, त्यामुळे याचिकाकर्त्याचा जामीन अर्ज फेटाळत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
एनआयएच्या प्रकरणानुसार, डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत, अर्जदार जेकब आणि दोन परदेशी नागरिकांसह अन्य चार व्यक्तींनी, संगणक व इंग्रजी भाषेत पारंगत असलेल्या भारतीय तरुणांना लक्ष्य केले. त्या तरुणांना थायलंडमध्ये आकर्षक नोकऱ्यांचे प्रलोभन दाखवले आणि त्यानंतर आर्थिक फायद्यासाठी त्यांना पर्यटक व्हिसावर फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटर्समध्ये काम करण्यास भाग पाडले. या पीडितांना भारतातून थायलंडमार्गे लाओस येथील गोल्डन ट्रँगलमध्ये पाठवले जाई. काही पीडितांनी सुटकेसाठी भारतीय दूतावासाशी संपर्क साधला असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली आणि त्यांचे पासपोर्ट हिसकावले. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी या पीडितांची सुटका केली आणि त्यांना भारतात परत पाठवले. भारतात परतल्यानंतर त्यांनी येथे तक्रार दाखल केली. आरोपींवर मानवी तस्करी आणि गुलामगिरीशी संबंधित भादंवि, तसेच इमिग्रेशन आणि फॉरेनर्स ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.