औद्योगिक नगरीत सुटकेचा श्वास
बोईसर-तारापूरमधील हवेची गुणवत्ता सुधारली; नागरिकांना दिलासा
पालघर/बोईसर, ता. १४ ः पालघर जिल्ह्यातील बोईसर-तारापूर परिसरातील हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या सुधारली आहे. मार्चच्या पहिल्या १३ दिवसांच्या हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाच्या नोंदींनुसार केवळ तीन दिवस हवा खराब श्रेणीत नोंदवली गेली असून, उर्वरित दिवसांमध्ये समाधानकारक हवा राहिली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून तारापूर एमआयडीसी परिसरातील औद्योगिक प्रदूषण, वाहनांची वाढती संख्या, हवामानातील बदलांमुळे बोईसर-तारापूर परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक सातत्याने खालावत होता. काही दिवसांमध्ये हवेची पातळी ‘खराब’, ‘अस्वास्थ्यकारक’ श्रेणीची असल्याने नागरिकांमध्ये आरोग्याबाबत भीती निर्माण झाली होती. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना श्वसनविकारांचा त्रास होत होता. पण मार्चच्या सुरुवातीपासून परिस्थितीत सकारात्मक बदल झाला आहे. अधिकृत नोंदींनुसार १३ दिवसांमध्ये हवा निर्देशांक ‘समाधानकारक’ किंवा ‘मध्यम’ श्रेणीत राहिला आहे. त्यामुळे वातावरणातील प्रदूषणाचे प्रमाण तुलनेने कमी झाल्याचे संकेत मिळत आहेत.
--------------------------------
धूर, धुळीचा त्रास
- हवामानातील बदल, वाऱ्याचा वेग वाढणे, औद्योगिक उत्सर्जनावर काही प्रमाणात नियंत्रण तसेच धुळीचे प्रमाण कमी होणे, यामुळे वातावरणातील प्रदूषणाचे प्रमाण घटले असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे. त्याचबरोबर काही औद्योगिक कंपन्या प्रदूषण नियंत्रण करीत असल्याचे सांगितले जाते.
- सकाळच्या वेळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांना धूर, धुळीचा त्रास होत होता. दरम्यान, सध्या हवा तुलनेने स्वच्छ असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हवेची गुणवत्ता सुधारल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
-----------------------------------
नियंत्रण ठेवणे गरजेचे
हवेची गुणवत्ता सध्या सुधारली असली तरी ती कायमस्वरूपी चांगली राहण्यासाठी औद्योगिक प्रदूषणावर कठोर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे पर्यावरणप्रेमी संघटनांनी स्पष्ट केले. तसेच नियमित हवा गुणवत्ता निरीक्षण, प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कारवाई, हरित उपक्रम वाढविणे गरजेचे आहे. तर हवा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक राहण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात असल्याने गुणवत्ता सुधारल्याचे मंडळाने म्हटले आहे.
----------------------------------
निर्देशांक
महिना नोंदवलेला निर्देशांक श्रेणी
फेब्रुवारी १०० ते १७३ मध्यम ते खराब
मार्च ७४ ते ९४ चांगली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.