तुर्भेतील पालिका शाळेजवळ अस्वच्छता
भंगार व्यवसायामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
तुर्भे, ता. १४ (बातमीदार) : तुर्भे एमआयडीसी परिसरातील इंदिरानगर येथील नवी मुंबई महापालिकेच्या शाळा क्रमांक २५च्या परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि अवैध भंगार व्यवसाय सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर बनला आहे. शाळेजवळ रस्त्यावर विखुरलेला कचरा, लोखंडी तुकडे आणि काचांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाले असून, या प्रकारावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे उप शहरप्रमुख सिद्धाराम शीलवंत यांनी केली आहे.
इंदिरानगर परिसरातील या महापालिका शाळेत तुर्भे आणि आसपासच्या भागातील सुमारे १,५०० ते २,००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शाळेजवळील रस्त्यावर लोखंडी तुकडे, खिळे, काचा, बाटल्या, प्लॅस्टिक कचरा तसेच खिळे लागलेले लाकडी फळे मोठ्या प्रमाणात पडलेली दिसून येतात. त्यामुळे शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना जखमी होण्याचा धोका आहे. तसेच परिसरात साचलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून डास व इतर कीटक वाढण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
या समस्येबाबत स्थानिक नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांनी अनेक वेळा नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्याचे सांगितले जाते. मात्र वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पालक आणि स्थानिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
दरम्यान, मंगळवारी शिवसेना (ठाकरे गट)चे उप जिल्हाप्रमुख तथा ऐरोली विधानसभा शहरप्रमुख महेश कोटीवाले आणि उप शहरप्रमुख सिद्धाराम शीलवंत यांनी शाळा परिसराला भेट देत विद्यार्थ्यांशी आणि शाळेतील कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी परिसरातील भंगार व्यावसायिकांनी रस्त्यावर ठेवलेले सर्व साहित्य दोन दिवसांच्या आत दुकानात किंवा गोडाऊनमध्ये हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
चौकट
कारवाई न झाल्यास आंदोलन
शाळेजवळील अस्वच्छता आणि अवैध भंगार व्यवसाय तातडीने हटवण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असल्याने प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये, असेही सांगण्यात आले. येत्या पाच दिवसांत नवी मुंबई महापालिकेकडून या प्रकरणावर ठोस कारवाई करण्यात आली नाही, तर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दालनात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे उप शहरप्रमुख सिद्धाराम शीलवंत यांनी दिला. विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रश्न तातडीने सोडवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोट
महापालिका प्रशासनानेही या प्रकरणाची दखल घेतली असून, शाळेसमोर असलेले भंगार साहित्य हटवून परिसर स्वच्छ करण्यासाठी लवकरच कारवाई केली जाईल.
- सागर मोरे, सहाय्यक आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.