दुर्गंधीयुक्त जागी खाद्यपदार्थ विक्री
पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
खारघर, ता.१६ (बातमीदार) : शहरातील काही भागांमध्ये अत्यंत दुर्गंधीयुक्त व अस्वच्छ परिसरात उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. स्वच्छतागृहांच्या समोर, नाल्यांच्या कडेला, कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ तसेच अस्वच्छ वातावरणात भेळ, पाणीपुरी, चाट, वडापाव यांसारख्या खाद्यपदार्थांची विक्री होत असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याकडे पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
खारघर शहरातील फेरीवाल्यांची संख्या कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. उत्सव चौक सर्कललगत पालिकेच्या ई-टॉयलेटच्या जवळ अंडाभुर्जीचा स्टॉल लावला जात असल्याचे दिसून येते. तसेच मुर्बी गावाकडून रांजणपाडा गावाकडे जाणाऱ्या सर्कललगत नाल्यातील कचऱ्याचा तीव्र दुर्गंध पसरलेला असतानाही त्याच परिसरात खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले जात असल्याचे चित्र आहे.
खारघरमधील इतरही काही सेक्टरमध्ये स्वच्छतेचे कोणतेही नियम न पाळता उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करून विक्री केली जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः सायंकाळच्या वेळेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने अस्वच्छ वातावरणात तयार होणारे अन्न खाल्ल्यामुळे पोटाचे आजार तसेच संसर्गजन्य रोगांचा धोका वाढू शकतो, अशी भीती आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
महापालिकेच्या अन्न व औषध विभागाने तसेच आरोग्य विभागाने अशा ठिकाणांची तपासणी करून स्वच्छतेचे नियम न पाळणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अशा अस्वच्छ ठिकाणी होणारी खाद्यपदार्थांची विक्री तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणीही होत आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून प्रशासन नेमकी कारवाई कधी करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कोट
कर्मचा-यांकडून चौकशी करण्यात येईल व त्यानंतर कारवाई केली जाईल.
- रुपाली माने, प्रभाग अधिकारी खारघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.