मुंबई

गॅस टंचाईने खाऊ गल्ल्यांची चव बदलली

CD

गॅसटंचाईने खाऊ गल्ल्यांची चव बदलली; रॉकेल, कोळशावर सुरू छोट्या व्यावसायिकांची झुंज
आखाती युद्ध तणावाचे दूरगामी परिणाम; रोजच्या कमाईवर जगणाऱ्यांसमोर मोठे आव्हान
नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : पावभाजी तयार आहे का? दोन वडा-पाव पटकन द्या, अशी विचारणा, मागण्या ऐकू येणाऱ्या मुंबईच्या खाऊ गल्ल्यांमध्ये सध्या वेगळीच चर्चा रंगली आहे. गॅस कधी मिळणार? आखाती देशांतील युद्ध तणावामुळे निर्माण झालेल्या एलपीजी गॅसटंचाईने स्ट्रीट फूड व्यावसायिकांचे दैनंदिन गणित पूर्णपणे बदलले आहे. गॅस सिलिंडर मिळण्यास होणारा विलंब आणि वाढत्या किमतीमुळे अनेकांनी नाइलाजाने रॉकेल आणि कोळशाचा वापर सुरू केला असून, त्यातून वाढता खर्च, धुराचा त्रास आणि व्यवसाय टिकवण्याची धडपड अधिकच तीव्र झाली आहे.
सीएसएमटी परिसर, दादर, कुर्ला, भायखळा यांसारख्या गर्दीच्या भागांतील खाऊ गल्ल्यांमध्ये नेहमीप्रमाणे ग्राहकांची वर्दळ असते; मात्र स्टॉलच्या मागे उभ्या असलेल्या व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर आता चिंता अधिक दिसते. गॅस नसल्यामुळे काही ठिकाणी आधीच्या तुलनेत कमी प्रमाणात पदार्थ तयार केले जात आहेत. काहींनी मेनू कमी केला आहे, तर काहींनी इंधन वाचवण्यासाठी वेळापत्रक बदलले आहे.
काही व्यावसायिक सांगतात, की कोळशाची भट्टी पेटवण्यासाठी सकाळीच तयारी करावी लागते. कोळसा पेटेपर्यंत वेळ जातो आणि रॉकेल स्टोव्हची देखभालही करावी लागते. दिवसभर धुरात काम केल्याने डोळ्यांची जळजळ, घशात खवखव आणि थकवा जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले. तरीही ग्राहक परत जाऊ नयेत म्हणून ते सर्व अडचणींवर मात करीत व्यवसाय सुरू ठेवत आहेत.
गॅस सिलिंडरसाठी प्रतीक्षा कालावधी वाढल्याने अनेकांनी आगाऊ नोंदणी करून ठेवली आहे. काही जणांनी खासगी बाजारातून महागड्या दराने सिलिंडर घेण्याची वेळ आल्याचेही सांगितले. गॅस आला की दोन-तीन सिलिंडर एकदम घेऊन ठेवतो. कारण पुन्हा कधी मिळेल याची खात्री नसते, असे एका व्यावसायिकाने सांगितले. याचा परिणाम कामगारांवरही होत आहे.
काही ठिकाणी कामाचे तास कमी झाले आहेत, तर काही स्टॉलवर कामगारांना आळीपाळीने बोलावले जात आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांसाठी ही परिस्थिती अधिकच कठीण ठरत आहे. कारण दिवसाचा कामाचा वेळ कमी झाला की थेट उत्पन्नावर परिणाम होतो.
गॅसटंचाई किती दिवस राहणार हे माहीत नाही पण परिस्थिती सुधारेल, या आशेवर आम्ही काम करीत आहोत. ग्राहकांचा विश्वास टिकवणे हेच आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे, अशी प्रतिक्रिया एका स्ट्रीट फूड व्यावसायिकाने दिली.

खाऊ गल्ली म्हणजे फक्त खाणे नाही, तर अनेकांचे जगणे
सीएसएमटी आणि सेंट जॉर्ज रुग्णालय परिसरातील खाऊ गल्ली ही केवळ खाद्यपदार्थांची बाजारपेठ नाही, तर अनेकांसाठी जीवनरेषा आहे. बाहेरगावाहून उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे नातेवाईक, हमाल, टॅक्सीचालक, रोजंदारी कामगार आणि रेल्वे प्रवासी यांच्यासाठी येथे मिळणारे कमी दरातील अन्न म्हणजे मोठा दिलासा असतो. त्यामुळे या व्यवसायांवरील संकट म्हणजे अनेकांच्या जेवणाच्या ताटावरचे संकट मानले जात आहे.

इंधन टंचाईचा साखळी परिणाम
गॅसटंचाईमुळे रॉकेल आणि कोळशाच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. त्यामुळे रॉकेलचे दर तिपटीने वाढल्याची तक्रार आहे, तर कोळशाच्या गोणींसाठीही अधिक पैसे मोजावे लागत आहेत. काही व्यावसायिकांनी इंधन साठवण्यासाठी अतिरिक्त खर्च केला असून, त्यामुळे त्यांच्या भांडवलावर ताण वाढला आहे.

सुरक्षेची वाढती धास्ती
रॉकेल आणि कोळशाच्या वापरामुळे अपघाताचा धोका वाढल्याची भीती व्यक्त होत आहे. काही व्यावसायिकांनी खबरदारी म्हणून अग्निशामक यंत्र, पाण्याच्या बादल्या आणि वाळूची पोती ठेवली आहेत. सुरक्षितता महत्त्वाची आहे, पण त्यासाठीही खर्च करावा लागतो, असे ते सांगतात.

व्यावसायिकांच्या प्रमुख मागण्या
१. गॅस सिलिंडरचा नियमित आणि पुरेसा पुरवठा करावा.
२. स्ट्रीट फूड व्यावसायिकांसाठी सवलतीच्या दरात गॅस उपलब्ध करून द्यावा.
३. इंधन दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा.

आमचा व्यवसाय रोजच्या कमाईवर चालतो. एक दिवस दुकान बंद म्हणजे त्या दिवशी घरचा खर्च अडतो. त्यामुळे अडचणी असल्या तरी आम्ही गाडी थांबवत नाही.
- भास्कर कारे, स्ट्रीट फूड व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT