ठाणे शहर, ता. १५ (बातमीदार) : घरातून बेपत्ता झालेल्या एका मनोरुग्णाची ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने उपचारांती यशस्वीपणे घरवापसी केली आहे. १३ वर्षांपूर्वी तो वांद्रे पोलिसांना बेवारस अवस्थेत भटकताना आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला उपचारासाठी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर उपचार करत असताना डॉक्टरांनी त्याच्याशी संवाद साधत त्याचा घराचा पत्ता शोधून त्याला शुक्रवारी (ता. १३) मध्य प्रदेशात कुटुंबाच्या स्वाधीन केले.
मुंबईतील वांद्रे पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांना एक मनोरुग्ण पुरुष बेवारस भटकताना आढळून आला होता. पोलिसांच्या तपासात तो मानसिक संतुलन बिघडल्याचे आढळून आले होते. त्यामुळे उपचारासाठी पोलिसांनी त्याला ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले होते. त्या वेळी त्याची अवस्था दयनीय होती. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशषी पाठक यांच्या देखरेखीखाली त्या रुग्णावर उपचार करण्यात आले. सुरुवातीला तो स्वतःबद्दल कोणतीही माहिती देत नव्हता. कधी वांद्रे, कधी दिल्ली, तर कधी मध्य प्रदेश किंवा उत्तर प्रदेश असे वेगवेगळे पत्ते सांगत होता. त्यामुळे त्याचा खरा पत्ता शोधणे कठीण झाले होते, अशी माहिती समाजसेवा अधीक्षक सतीश वाघ यांनी दिली.
रुग्णालयात उपचार आणि समुपदेशन सुरू असताना त्याच्या गावाचे नाव रामनगर, जिल्हा सतना (मध्य प्रदेश) असे सांगितले. या माहितीच्या आधारे रुग्णालयाने तातडीने सतना पोलिस ठाण्याशी संपर्क साधून स्थानिक अधिकारी विजय त्रिपाठी यांना रुग्णाची माहिती व फोटो पाठवला. स्थानिक पातळीवर शोध घेतल्यावर अवघ्या तासाभरात रुग्णाचे नातेवाइक शोधण्यात यश आले. रुग्णालय प्रशासनाने नातेवाइकांशी व्हिडिओ कॉलद्वारे ओळख पटवून त्याची खात्री केली. त्यानंतर रुग्णाचा भाचा, वहिनी व इतर नातेवाईक तातडीने ठाणे येथे दाखल झाले. या मोहिमेसाठी उपाधीक्षिका डॉ. प्राची चिवटे, समाजसेवा अधीक्षक सतीश वाघ, मनोविकृतीतज्ज्ञ परिचारिका मानसी दुखंडे, तेजस्विनी पवार तसेच इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
रुग्ण सुशिक्षित पदवीधर असून, त्याला लेखनाची खूप आवड होती. मात्र, मानसिक स्थिती बिघडलेल्या अवस्थेत घर सोडून त्याने मुंबई गाठल्याचे रुग्णाचा मित्र सलीम शेख याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.