नवी मुंबई विमानतळाला
दि. बा. पाटील यांचेच नाव
केंद्रीय मंत्रीमंडळासमोर प्रस्ताव सादर करणार ः म्हात्रे
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा प्रलंबित प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे. या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रीमंडळासमोर सादर केला जाईल, अशी माहिती भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी आज भिवंडीतील पत्रकार परीषदेत दिली. केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी यासंदर्भात सकारात्मक ग्वाही दिल्याचेही म्हात्रे यांनी या वेळी सांगितले.
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, यासाठी आगरी-कोळी समाज आणि स्थानिक भूमिपुत्रांनी मोठा लढा दिला होता. नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतरही नामांतरणाचा प्रश्न अद्याप रखडलेला आहे. अनेक आंदोलने करूनही हा प्रश्न प्रलंबित राहिल्याने स्थानिक स्तरावर नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर खासदार सुरेश म्हात्रे यांनी जनआंदोलन करत केंद्रातही पाठपुरावा सुरू ठेवला होता. मागील आठवड्यात दिल्लीत केंद्रीय मंत्री नायडू यांची भेट घेऊन प्रलंबित नामांतरणाविषयी मार्ग काढण्याची विनंती म्हात्रे यांनी केल्याने आता नामकरणाचा मार्ग मोकळा होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी मुंबई, पनवेल, उरण तसेच रायगड आणि ठाणे परिसरातील भूमिपुत्रांची नामकरणाची जुनी भावना आहे. त्यामुळे नामकरणाच्या या मागणीला राज्य सरकारने यापूर्वी मान्यता दिली असून राज्य मंत्रिमंडळ तसेच विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनीही या नामकरणाच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. विमानतळाच्या अधिकृत नामकरणासाठी केंद्र सरकारची अंतिम मंजुरी आवश्यक असल्याने सध्या तो प्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन आहे. केंद्र आणि राज्य सरकार याबाबत सकारात्मक असून, लवकरच यावर शिक्कामोर्तब होईल. हा येथील भूमिपुत्रांच्या एकजुटीचा आणि संघर्षाचा विजय असल्याचेही खासदार म्हात्रे यांनी सांगितले.
भिवंडी रोड स्थानकावर एक्स्प्रेस थांबणार
लांब पल्ल्याच्या गाड्या भिवंडी येथे थांबत नसल्याने रेल्वे प्रवाशांचे हाल होत होते. ही बाब रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, दिवा-वसई मार्गावरील सातपैकी तीन एक्स्प्रेस गाड्यांना भिवंडीत थांबा मिळणार आहे. तसेच वाशिंद येथील तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यावर दिवा-वसई मेमू ट्रेन थेट सीएसएमटीपर्यंत नेण्याचे आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी दिल्याचेही खासदार म्हात्रे यांनी नमूद केले.
मुरबाडकरांची रेल्वे प्रतीक्षा संपणार
कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी एक हजार ४०० कोटी रुपये भूमी अधिग्रहणासाठी खर्च येणार असून या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकार दोन्ही सकारात्मक आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्प मार्गी लागणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्याला दिली असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.