डायलिसिस रुग्णांसाठी सेंट जॉर्जचा दिलासा
वाढत्या रुग्णभारामुळे विभागाचे नूतनीकरण; २४ तास सेवा नियोजित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : सेंट जॉर्ज रुग्णालयात रुग्णसेवेच्या सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. रुग्णालयातील डायलिसिस विभागाचे नूतनीकरण करण्यात येत असून, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा विभाग लवकरच २४ तास सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
सेंट जॉर्ज रुग्णालयातील डायलिसिस विभाग शहरातील सर्वप्रथम मेंटेनन्स डायलिसिस सेवा देणाऱ्या केंद्रांपैकी एक म्हणून ओळखला जातो. सुरुवातीपासूनच या विभागाने हजारो रुग्णांना जीवनदान देणारी सेवा दिली आहे. आता विभागाचे आधुनिकीकरण करून अत्याधुनिक यंत्रणा आणि अधिक सोयीसुविधांसह डायलिसिस सेवा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे.
गेल्या दोन वर्षांत डायलिसिससाठी येणाऱ्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. रुग्णालयाने जाहीर केलेल्या वार्षिक आकडेवारीनुसार २०२३ ते २०२५ दरम्यान डायलिसिस रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. २०२३ मध्ये जुलैपासून सुरू झालेल्या नोंदींनुसार वर्षभरात एकूण २०९ रुग्णांवर डायलिसिस उपचार करण्यात आले. त्यात ८० आंतररुग्ण आणि १२९ बाह्यरुग्ण रुग्णांचा समावेश होता. यानंतर २०२४ मध्ये ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. त्या वर्षी २,३७९ डायलिसिस सत्रांची नोंद झाली. यामुळे डायलिसिस सेवांवर वाढत्या रुग्णभाराचे चित्र स्पष्ट झाले.
२०२५ मध्ये ही वाढ आणखी वेगाने झाली. वर्षभरात ४,००३ डायलिसिस उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे ओपीडीद्वारे डायलिसिस घेणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे दिसून आले. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, किडनीसंबंधित आजार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्यांमुळे डायलिसिसची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक रुग्णालयातील परवडणाऱ्या उपचारांमुळे सेंट जॉर्ज रुग्णालय अनेक रुग्णांसाठी आधार बनत आहे.
नूतनीकरणानंतर डायलिसिस विभागात आधुनिक मशीन, सुधारित पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने रुग्णांना अधिक जलद व सुरक्षित उपचार मिळणार आहेत. विशेषतः मूत्रपिंडाच्या दीर्घकालीन आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना या २४x७ सेवेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
रुग्णालय प्रशासनाच्या मते, वाढत्या रुग्णसंख्येमुळे डायलिसिस सेवेत वाढ करणे आवश्यक झाले होते. त्यामुळे नव्या सुविधांमुळे अधिक रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील आणि सार्वजनिक आरोग्यसेवेतही मोठी मदत होईल.
सेंट जॉर्ज रुग्णालयात डायलिसिस विभागासोबतच इतर वैद्यकीय सेवांमध्येही मोठ्या प्रमाणावर सुधारणा आणि आधुनिकीकरणाची कामे सुरू असून, रुग्णांना अधिक चांगल्या व परवडणाऱ्या आरोग्यसेवा देण्याचा रुग्णालयाचा संकल्प आहे.
- डॉ. विनायक सावर्डेकर, अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.