सिलिंडरच्या साठेबाजीला ऊत
जिल्ह्यावर युद्धाचे पडसाद, अफवांमुळे भीतीचे वातावरण
पालघर, ता. १६ ः अमेरिका-इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच पालघर जिल्ह्यात अनेक भागांमध्ये सिलिंडरच्या जादा दराने विक्रीबरोबरच साठेबाजीलाही ऊत आला आहे.
युद्धसदृश परिस्थितीबाबत समाजमाध्यमांवर विविध अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचा साठा करण्याकडे अनेकांचा कल आहे. त्याचा परिणाम वितरण व्यवस्थेवर झाला आहे. वाढलेल्या मागणीमुळे काही भागांमध्ये नियमानुसार सिलिंडर मिळत असला तरी वितरणात विलंब होत आहे, तर काही ठिकाणी सिलिंडरची साठेबाजी होत असल्याचे उघड झाले आहे. साठेबाजी तसेच व्यावसायिक वापरावर प्रतिबंध आणण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी आठ तालुक्यात अधिकारी नियुक्त केले आहेत. त्यानुसार तालुकानिहाय पथकांमार्फत तपासणी केली जात असून, ४१ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या, तर वसई तालुक्यात एकावर गुन्हा दाखल असून, तिघे अटकेत आहेत.
----------------------------------------------
प्रशासकीय यंत्रणा गोंधळलेली
हॉटेल तसेच खाद्य व्यावसायिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. वाढत्या मागणीमुळे सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. या परिस्थितीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत असून, साठेबाजी करणाऱ्यांवर तसेच जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे, पण अफवांमुळे परिस्थिती हाताळताना प्रशासकीय यंत्रणाच गोंधळलेली आहे.
---------------------------
‘या’ आस्थापनांना सेवा
- रुग्णालये, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक सेवा, स्मशानभूमी, वृद्धाश्रम, अनाथाश्रम.
- उपाहारगृहे, संरक्षण क्षेत्र, शासकीय व सार्वजनिक क्षेत्र, रेल्वे, हवाई वाहतूक, पोलिस.
- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, औषध उद्योग, बीज प्रक्रिया, मत्स्यपालन क्षेत्र.
-------------------------------
जिल्ह्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तसेच पुरवठा व्यवस्थेत कोणतीही अधिकृत अडचण नसताना अफवांमुळे परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांनी एजन्सीसमोर गर्दी करू नये.
- भाऊसाहेब फटांगरे, अपर जिल्हाधिकारी, पालघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.