शीव स्थानकातून बाहेर पडणे मुश्कील
भुयारी मार्गामुळे प्रवाशांची प्रचंड गर्दी; जिने बंद केल्याने अडचणी वाढल्या
धारावी, ता. १६ (बातमीदार) : सायन स्थानकासमोरील लालबहादूर शास्त्री मार्गाखाली नव्याने तयार करण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे काम सुरू असतानाच त्याचे घाईघाईत उद्घाटन करण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानकातील पूर्वीचे जिने अचानक बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांना केवळ भुयारी मार्गाचा वापर करून धारावीकडे जावे लागत असून, त्यामुळे येथे प्रचंड गर्दी होत आहे.
हा भुयारी मार्ग धारावीकरांना सायन रेल्वे स्थानक गाठण्यासाठी उपयुक्त ठरत असला तरी अन्य मार्ग बंद झाल्याने प्रवाशांच्या अडचणीत भर पडली आहे. फलाट क्रमांक १ आणि २ वर एकाच वेळी गाड्या आल्यास प्रवासी मोठ्या संख्येने भुयारी मार्गाकडे येतात. परिणामी स्थानकाबाहेर पडताना मोठी गर्दी होते. या गर्दीतून मार्ग काढत रस्त्यावर पोहोचणे तसेच स्थानकात प्रवेश करणे प्रवाशांसाठी अवघड ठरत आहे. विशेषतः लहान विद्यार्थी, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे.
भुयारी मार्गात अनेकदा अंधार निर्माण होत असल्याने धक्काबुक्कीचे प्रकार घडतात आणि त्यातून वादही होतात. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे. घाईघाईत भुयारी मार्गाचे उद्घाटन करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी तसेच संबंधित पक्षांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष या समस्येकडे वेधून तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.