नाट्यरसिकांसाठी ‘उत्कर्ष’ नाट्यमहोत्सवाची रंगत
प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात दर्जेदार नाट्यप्रयोगांची मेजवानी
मालाड, ता. १६ (बातमीदार) : शिक्षण प्रसारक मंडळ उत्कर्ष मंदिर विद्यालयाच्या सप्तदशक वर्षानिमित्त ‘उत्कर्ष’ नाट्यमहोत्सवाची सोमवारी (ता. १६) सुरुवात झाली आहे. या महोत्सवात विविध विषयांवरील दर्जेदार नाट्यप्रयोग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. हा नाट्यमहोत्सव बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे मुख्य नाट्यगृहात पार पडत आहे.
या नाट्यमहोत्सवाची सुरुवात सोमवारी ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ या नाटकाने झाली. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जीवनातील अपरिचित पैलूंवर प्रकाश टाकणारे हे नाटक असून, त्यात योगिता बेडेकर आणि यतिन ठाकूर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्यानंतर मंगळवारी (ता. १७) सकाळी १० ते १ या वेळेत ‘कडीपत्ता’ हे कुटुंबव्यवस्थेवर भाष्य करणारे नाटक सादर होणार आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या मंगळवारी (ता. २४) ‘माकडचाळे’ हे बालनाट्य रंगणार असून, हसत-खेळत बालसंस्कार घडविणारा हा प्रयोग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच शनिवार, ४ एप्रिलला व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘व्यंकूची शिकवणी’ या कथेवर आधारित ‘शिकायला गेलो एक’ हे विनोदी नाटक नाट्यरसिकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांची प्रमुख भूमिका यात पाहण्यास मिळणार आहे.
एवढेच नाही तर शनिवार, १८ एप्रिलला आचार्य प्रल्हाद केशव अत्रे लिखित ‘संगीत प्रीतिसंगम’ हे संगीत नाटक सादर होणार आहे. तर त्याच्या पुढच्या शनिवारी म्हणजेच २५ एप्रिलला उत्कर्ष मंदिर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा ‘शिखरे उत्कर्षाची’ हा कलाविष्कार सादर केला जाणार आहे. नाट्यमहोत्सवातील सर्व प्रयोग प्रबोधनकार ठाकरे मुख्य नाट्यगृह, बोरिवली येथे होणार असून, आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य आणि हितचिंतकांनी या महोत्सवाला उपस्थित राहावे, असे आवाहन उत्कर्ष मंदिर विद्यालयाच्या आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.