रुग्णांच्या आहाराचा प्रश्न ऐरणीवर
गॅस सिलिंडर टंचाईचा समाजसेवी आश्रमांना फटका
खारघर, ता. १७ (बातमीदार) : इंधनपुरवठ्यातील अडचणीमुळे निर्माण झालेल्या गॅस सिलिंडर टंचाईचा फटका आता समाजसेवा करणाऱ्या संस्थांनाही बसू लागला आहे. खारघर परिसरातील कॅन्सर रुग्णांची सेवा करणाऱ्या काही आश्रमांना या टंचाईमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळित झाल्याने शेकडो गरीब रुग्णांच्या भोजनाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
खारघर येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात देशातील विविध भागांतून उपचारासाठी आलेले कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक तात्पुरत्या स्वरूपात आश्रमात वास्तव्यास असतात. अनेक रुग्ण आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याने काही सामाजिक संस्था त्यांना नाममात्र शुल्कात किंवा विनाशुल्क निवास आणि भोजनाची सुविधा उपलब्ध करून देतात. त्यामुळे या आश्रमांवर दररोज मोठ्या प्रमाणात स्वयंपाकाची जबाबदारी असते. यासाठी मोठ्या प्रमाणात कमर्शियल गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने स्वयंपाकाची व्यवस्था विस्कळित होत आहे. या पार्श्वभूमीवर आश्रम प्रशासनाने संबंधित गॅस वितरण संस्था आणि प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. कॅन्सर रुग्णांची सेवा करणाऱ्या अशा संस्थांना प्राधान्याने गॅस सिलिंडर पुरवठा करण्यात यावा, अशी विनंती सामाजिक संस्थांकडून करण्यात आली आहे. तसेच स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनीही या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली आहे. यासंदर्भात पुरवठा अधिकारी अश्विनी धवणे आणि तहसीलदार मिनल भोसले यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
पर्यायी इंधनाचा वापर मर्यादित
कॅन्सर उपचार घेत असलेल्या रुग्णांना वेळेवर आणि पौष्टिक आहार मिळणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे सिलिंडर टंचाईचा सर्वाधिक फटका याच रुग्णांना बसत असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत आहे. काही वेळा पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी त्यातून पूर्ण गरज भागत नसल्याचे आश्रम व्यवस्थापनाने सांगितले. परिस्थिती कायम राहिल्यास रुग्णांसाठी जेवणाची व्यवस्था करणे कठीण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
आश्रमात सध्या १२० रुग्ण आहेत. सिलिंडर टंचाईमुळे रुग्णांची उपासमार होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात गुरुद्वाराकडून सहकार्य मिळत आहे. तसेच सिडकोकडून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
- सुनील पाटील, संत गाडगे महाराज धर्मार्थ सेवा आश्रम, खारघर
सिलिंडर टंचाईमुळे रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था करताना अनेक अडचणी येत आहेत. रुग्णांची उपासमार होऊ नये म्हणून डाळ-भात बनवण्यासाठी चुलीची सोय करण्याचाही विचार सुरू आहे.
- समीर दास, श्रद्धा फाउंडेशन, खारघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.