तुर्भे, ता. १६ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या पशुवैद्यकीय रुग्णालयाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. जुईनगर येथे उभारण्यात आलेल्या या रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे भटके, तसेच पाळीव प्राणी-पक्ष्यांवर उपचाराची सुविधा आता उपलब्ध झाली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लागल्याने प्राणीप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून स्वतंत्र पशुवैद्यकीय रुग्णालयाचा प्रस्ताव प्रलंबित होता. जागेच्या अभावामुळे रुग्णालय उभारणीला विलंब होत होता. अखेर नेरूळ विभागातील जुईनगर सेक्टर २४ मधील भूखंड क्रमांक ५ व ६ येथे सिडकोकडून सुमारे ९२०.७७४ चौ. मी. क्षेत्रफळाचा भूखंड महापालिकेला मिळाला. त्यानंतर फेब्रुवारी २०१९ मध्ये रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले होते. सुमारे पाच कोटी खर्च करून दोन मजली इमारत उभारण्यात आली आहे.
यापूर्वी महापालिकेचे स्वतंत्र पशुवैद्यकीय रुग्णालय नसल्याने कोपरी येथील श्वान निर्बीजीकरण केंद्रात जखमी प्राणी व पक्ष्यांवर उपचार केले जात होते. नंतर हे केंद्र तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंड परिसरात हलवण्यात आले. मात्र, तेथील सुविधा अपुऱ्या असल्याने स्वतंत्र रुग्णालयाची मागणी प्राणीप्रेमींकडून सातत्याने होत होती. आता जुईनगर सेक्टर २४ मधील इमारतीमध्ये बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. येथे प्राणी-पक्ष्यांची तपासणी, लसीकरण, तसेच प्राथमिक उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. शस्त्रक्रियेसाठी कंत्राटी पद्धतीने निवासी, तसेच ‘ऑन कॉल’ डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे.
या सुविधा मिळणार...
रुग्णालयात तळमजल्यावर प्राण्यांसाठी शस्त्रक्रिया कक्ष, तपासणी कक्ष, निर्जंतुकीकरण कक्ष, डॉक्टर कक्ष, प्रतीक्षा कक्ष, श्वानांसाठी स्वतंत्र विभाग, तसेच पक्ष्यांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत. दुसऱ्या मजल्यावर कार्यालय, बैठकीचा कक्ष, औषध वितरण कक्ष, प्रयोगशाळा, नोंद कक्ष आणि कर्मचारी विश्रांती कक्षाची व्यवस्था आहे. नागरिक आणि प्राण्यांसाठी स्वतंत्र लिफ्टची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
भटक्यांवर मोफत उपचार
आठवड्यातील सहा दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सेवा उपलब्ध राहणार असून, शनिवारी अर्धा दिवस सेवा दिली जाणार आहे. भटक्या प्राणी-पक्ष्यांवर येथे मोफत उपचार केले जाणार असून, पाळीव प्राण्यांसाठी सशुल्क सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.