३,२१५ किलोमीटर प्रवासाची ध्येयपूर्ती
विद्याधर भुस्कुटे यांच्या महाराष्ट्र पदभ्रमण यात्रेची सांगता
कल्याण, ता. १६ (वार्ताहर) : समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि विविध सामाजिक प्रश्नांबाबत जनजागृती करण्यासाठी पदभ्रमंतीकार विद्याधर भुस्कुटे यांनी हाती घेतलेल्या महाराष्ट्र पदभ्रमण यात्रेची रविवारी यशस्वी सांगता झाली. ३१ ऑक्टोबर २०२५ला सुरू झालेली ही ऐतिहासिक पदयात्रा ३,२१५ किलोमीटरचा टप्पा पूर्ण करून डोंबिवलीत परतली. यानिमित्ताने सावळाराम महाराज क्रीडा संकुलात भव्य स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
सोहळ्याला आमदार रवींद्र चव्हाण, आमदार राजेश मोरे, आर्य ग्लोबल शाळेचे अध्यक्ष भरत मलिक, विद्याधर भुस्कुटे आणि डॉ. विंदा भुस्कुटे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात युवराज ताम्हणकर यांनी सादर केलेल्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ आणि शिवरायांच्या पोवाड्याने झाली. यामुळे संपूर्ण जोशपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. आमदार रवींद्र चव्हाण यांनी म्हटले, की भुस्कुटे यांनी विशिष्ट संकल्पना घेऊन या पदयात्रेद्वारे सामाजिक कार्याचा अभेद्य सेतू बांधला आहे. समस्त डोंबिवलीकरांना त्यांच्या या धाडसाचा आणि कार्याचा सार्थ अभिमान आहे. तर डॉ. विंदा भुस्कुटे यांनी म्हटले, की आज विद्याधर यांचे ध्येय साध्य झाले याचा विशेष आनंद आहे. हे अवघड धनुष्य पेलताना अनेकांनी दिलेल्या साथीमुळेच हे शक्य झाले.
आपले मनोगत व्यक्त करताना विद्याधर भुस्कुटे भावुक झाले होते. ते म्हणाले की महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांमध्ये फिरताना शेतकरी, कष्टकरी आणि महिलांच्या समस्या जवळून जाणून घेतल्या. ३,२१५ किलोमीटरच्या या प्रवासात विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना समाजकार्यात सक्रिय होण्याचे आवाहन केले. आज ध्येयपूर्ती झाल्याचे समाधान मोठे आहे. कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते विद्याधर भुस्कुटे यांचा पुष्पहार घालून विशेष सत्कार करण्यात आला. या पदभ्रमंतीमुळे महाराष्ट्राच्या विविध भागांतील सामाजिक प्रश्नांवर मंथन झाले असून, पर्यावरणाचे महत्त्वही अधोरेखित झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.