वरळीत गुढीपाडव्याची भव्य शोभायात्रा
ढोलपथक करणार मराठी शाळांबाबत जनजागृती
मुंबई, ता. १६ : हिंदू नववर्षाचे स्वागत पारंपरिक उत्साह आणि मराठमोळ्या थाटात करण्यासाठी वरळी परिसरात भव्य गुढीपाडवा शोभायात्रा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. शिवसह्याद्री फाउंडेशन आणि ‘आम्ही वरळीकर’ या संकल्पनेतून आयोजित या शोभायात्रेचे यंदा सोळावे वर्ष असून, ती अधिक भव्य आणि आकर्षक करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वरळीतील सामाजिक संस्था, मंडळे, ट्रस्ट, सर्व राजकीय संघटना तसेच नागरिकांनी सहकुटुंब या शोभायात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच या वेळी ढोलताशा पथकाच्या माध्यमातून मराठी शाळा वाचवण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे.
ही शोभायात्रा गुरुवारी (ता. १९) सकाळी ७.३० वाजता जांबोरी मैदान, डॉ. जी. एम. भोसले मार्ग, वरळी येथून सुरू होईल. या वेळी मान्यवरांच्या हस्ते गुढी उभारून विश्वशांती प्रार्थना व शालेय विद्यार्थ्यांच्या सामूहिक महाराष्ट्र गीतांनी शोभायात्रेची सुरुवात होणार आहे. तसेच पारंपरिक वाद्यांचा गजर, मर्दानी खेळ, जव्हार येथील तारफा नृत्य, आकर्षक गुढ्या आणि विविध सांस्कृतिक देखावे यामुळे वातावरण उत्साहाने भारावून जाणार आहे. याशिवाय ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा भव्य चित्ररथ, बाइक रॅली, साई पालखी सोहळ्याची मिरवणूक, वारकरी भक्तिमय गजर, लेझीम पथक आणि भव्य ढोल पथक या आकर्षणांमुळे शोभायात्रेला विशेष रंगत येणार आहे.
यंदा ‘जल्लोष ढोल पथक’च्या तब्बल ९० जणांच्या भव्य समूहाचे विशेष आकर्षण असेल. या पथकातील सर्व सदस्य शाळेच्या गणवेशात ढोलवादन करीत मराठी शाळांचे महत्त्व अधोरेखित करणार आहेत. ‘मराठी शाळा वाचवा, मराठी शाळा वाढवा’ हा संदेश देण्यासाठी या समूहाकडून लोकनाट्याच्या माध्यमातून प्रभावी सादरीकरण करण्यात येणार असून, मराठी भाषा, संस्कृती आणि शिक्षण याबाबत जनजागृती करण्याचा अनोखा प्रयत्न या वेळी पाहायला मिळणार आहे. जागतिक महिला दिनाचा सन्मान म्हणून यंदाची गुढी विभागातील प्रमुख महिलांच्या हस्ते उभारण्यात येणार आहे. तसेच मराठी भाषा आणि मराठी शाळांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘मराठी शाळा’ या विषयावर भव्य रील स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेत विजेत्यांना ५० हजार रुपयांहून अधिक रोख पारितोषिके व सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत.
तसेच यंदाचे वर्ष हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष मानाचे असल्याने त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन अभिवादन करण्यात येणार आहे. सर्व नागरिकांनी पारंपरिक मराठमोळ्या वेशात, डोक्यावर फेटे परिधान करून आणि भगवा ध्वज घेऊन या शोभायात्रेत सहभागी व्हावे आणि हिंदू नववर्षाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा, असे आवाहन शिवसह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष संजय शंकर कदम आणि सरचिटणीस महेश खवणेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.