ठाण्यात २७ आयव्हीएफ सेंटर मंजुरीच्या प्रतीक्षेत
अर्ज करून दोन वर्षे उलटूनही मंजुरी मिळेना
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : बदलापूर येथील स्त्रीबीज विक्री प्रकरणाचे ठाणे कनेक्शन उघडकीस आल्यानंतर, आता ठाणे पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. ठाणे पालिका क्षेत्रात ११ आयव्हीएफ आणि २५९ सोनोग्राफी केंद्र आहे. या केंद्रावर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. असे असताना, दुसरीकडे ठाणे शहरातील २७ आयव्हीएफ केंद्रांनी आरोग्य विभागाकडे मंजुरीसाठी अर्ज करून दोन ते तीन वर्षे उलटूनही मंजुरी मिळाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बदलापूर पोलिसांनी अलीकडेच केलेल्या कारवाईत गरजू महिलांना पैशांचे प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून स्त्रीबीज विकसित करून घेतले जात असल्याचा प्रकार उघड झाला होता. या स्त्रीबीजांची नंतर बेकायदा विक्री केली जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान नाशिकमध्ये परवानगी असलेल्या एका आयव्हीएफ केंद्राचे ठाण्यात बेकायदा संचालन सुरू असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित केंद्राने ठाणे महापालिकेकडे कोणतीही नोंदणी न करता गुप्त पद्धतीने सेवा सुरू ठेवली होती. याची माहिती मिळताच बदलापूर पोलिस आणि ठाणे महापालिका आरोग्य विभागाने संयुक्त कारवाई करत त्या केंद्रावर धाड टाकली. कारवाईदरम्यान काही अनियमितता आढळून आल्याने संबंधित केंद्र बंद करण्यात आले आहे.
दरम्यान, ठाणे पालिका क्षेत्रात नव्याने आयव्हीएफ सेंटर सुरू करण्यासाठी २७ संस्थानी अर्ज सार्वजनिक आरोग्य विभागाकडे दाखल केले आहे. या संस्थांपैकी काही संस्थानी अर्ज करून दोन वर्षे झाले आहेत, तर काही संस्थांनी अर्ज करून एक वर्ष झाले आहे. मात्र, अद्यापही मंजुरी न मिळाल्याने या संस्थांवर आर्थिक बोजादेखील पडत असल्याने या आयव्हीएफ केंद्राने मंजुरी कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
आरोग्य विभागाची विशेष मोहीम
बदलापूर घटनेनंतर शहरात अशा प्रकारचे बेकायदा व्यवहार सुरू नसल्याची खात्री करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात ११ आयव्हीएफ केंद्र असून, त्यांची तपासणी करण्यात येत आहे. या कारवाईमुळे आयव्हीएफ केंद्र धारकांचे धाबे दणाणले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.