पाकिस्तानातून महाराष्ट्रात ड्रग्ज तस्करी
तस्करांच्या टोळीला बेड्या; नवी मुंबई पोलिसांची कारवाई
नवी मुंबई, ता. १६ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने पंजाबमधून महाराष्ट्रात ड्रग्जची तस्करी करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करीत तीन आरोपींना अटक केली आहे. अमली पदार्थाची पाकिस्तानातून महाराष्ट्रात तस्करी केली जात असल्याची माहिती आरोपींच्या चौकशीत उघडकीस आली. या वेळी आरोपींकडून सुमारे एक कोटी तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तळोजा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा तपास अमली पदार्थविरोधी कक्षाकडून सुरू होता. तपासादरम्यान पंजाबमधील बलजीतसिंग आणि गोपी हे आरोपी ट्रकच्या माध्यमातून मध्य प्रदेशमार्गे महाराष्ट्रात अमली पदार्थ आणत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलिस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश धुमाळ आणि त्यांच्या पथकाने संशयित ट्रकचा नाशिकपासून पाठलाग सुरू केला. अखेर पुणे जिल्ह्यातील चाकण एमआयडीसी परिसरातील निगोजे गावाजवळ ट्रक अडवून बलजीतसिंग सविंदरसिंग ऊर्फ मोनू, गुरुप्रतापसिंग शरणजीतसिंग ऊर्फ गोपी आणि करमजीतसिंग निंदरसिंग (ट्रकचालक) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान आरोपींकडून ८२.६ ग्रॅम उच्च प्रतीचे हेरॉईन (किंमत सुमारे ४१.३० लाख रुपये), ऑस्ट्रिया बनावटीचे ‘ग्लॉक’ पिस्तूल, दोन मॅगझिन, चार जिवंत काडतुसे, ५० लाख रुपये किमतीचा ट्रेलर, चार मोबाईल फोन आणि एक वजनकाटा असा एकूण एक कोटी तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
------
आतापर्यंत ४० आरोपींना अटक
पंजाब राज्यातून महाराष्ट्रात ट्रक तसेच रेल्वेमार्गे हेरॉईन व अफीम यासारख्या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आरोपींविरुद्ध अमली पदार्थविरोधी कक्षाने आतापर्यंत वेगवेगळे सहा गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत ४० आरोपींना अटक केली आहे. तसेच या कारवाईत सुमारे सहा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
------
पाकिस्तानातून अमली पदार्थांची तस्करी
पाकिस्तानातून हेरॉईन व अफीम हे अमली पदार्थ ड्रोनद्वारे पंजाबमध्ये पाठवण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती पंजाब राज्यातून महाराष्ट्रात ट्रक तसेच रेल्वेमार्गे अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आरोपींच्या चौकशीत उघडकीस आली आहे. पंजाबमध्ये आलेले हे अमली पदार्थ संपूर्ण देशभरात तस्करांमार्फत पाठवण्यात येत असल्याचेदेखील तपासात आढळून आले आहे.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.