विकसित भारताच्या व्हिजनमध्ये
महिला, युवकांच्या सक्षमीकरणाचे मार्ग
‘टिस’मधील परिसंवादात मान्यवरांचा सूर
मुंबई, ता. १६ : देशातील गरीब, युवा, शेतकरी आणि महिलांच्या सक्षमीकरणाचे मार्ग हे विकसित भारताच्या व्हिजनमध्ये असल्याचा सूर टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टिस) येथील परिसंवादात उमटला. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या ‘स्कूल ऑफ सोशल वर्क’तर्फे ‘सामाजिक धोरणे आणि व्यवहार : विकसित भारताच्या दिशेने’ या विषयावर एकदिवसीय परिसंवाद पार पडला. त्यात विविध मान्यवरांनी आपले मत मांडले.
केंद्र सरकारकडून ‘विकसित भारत २०४७’च्या अनुषंगाने राबविण्यात येत असलेले उपक्रम, योजनांच्या अंमलबजावणींच्या माध्यमातून देश विकासाच्या वाटेवर कसा जाऊ शकेल, याबाबत या वेळी चर्चा करण्यात आली. देशातील अन्नदात्याचा विकास व्हावा, महिलांचे सक्षमीकरण होऊन तरुणांना आपल्या विकासाचे मार्ग मिळावेत हेच विकसित भारताचे व्हिजन असल्याचेही या वेळी मान्यवरांनी सांगितले. दरम्यान, या वेळी भारताच्या विकास प्रक्रियेत सामाजिक धोरणांची भूमिका, समकालीन सामाजिक आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना यांवर शैक्षणिक तसेच धोरणात्मक पातळीवर सखोल चर्चा झाली. परिसंवादाचे उद्घाटन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माजी अध्यक्षा प्रीती सुदान यांच्या हस्ते झाले. सुदान यांनी बीजभाषणात सार्वजनिक धोरणे, प्रशासन आणि सामाजिक विकासातील समन्वयाची गरज स्पष्ट केली. परिसंवादाचे अध्यक्षस्थान स्कूल ऑफ सोशल वर्कचे अधिष्ठाता प्रा. बिपिन जोजो यांनी भूषविले. या वेळी ‘टिस’चे कुलगुरू प्रा. बद्री नारायण तिवारी यांनी उद्घाटनपर भाषण केले. प्रा. एस. परशुरामन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास सामाजिक क्षेत्रातील सुमारे १५० मान्यवर, संशोधक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी उपस्थित होते. परिसंवादाच्या निमित्ताने आयोजित ‘शेतमाल मेळा’ हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. या मेळ्यात तृणधान्यांपासून तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचे प्रदर्शन करण्यात आले तसेच शेतकरी आणि सहभागी यांच्यात पोषण, शाश्वत शेती आणि ग्रामीण उपजीविकेच्या मुद्द्यांवर संवाद साधण्यात आला.
----
अनुभवाधारित शिक्षणाची गरज
परिसंवादातील विविध सत्रांमध्ये ‘युवक आणि बालकांशी संबंधित प्रश्न व त्यांचे धोरणात्मक परिणाम’ तसेच ‘महिला आणि विकसित भारत’ या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतील बदलत्या वास्तवावरही संवाद साधण्यात आला. उच्च शिक्षणासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून (एनईपी) अनेक प्रभावी मार्ग निघतील; मात्र युवकांसाठी संधी उपलब्ध करण्याची, कौशल्यविषयक शिक्षणासोबतच प्रात्यक्षिक अनुभवाधारित शिक्षण देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. मुलांच्या सुरक्षेसाठी शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये बाल संरक्षण समित्या गठित करण्याची गरजही या वेळी व्यक्त करण्यात आली.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.