श्रमजीवी संघटनेचा तहसील कार्यालयांवर मोर्चा
महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅडची विनंती
टिटवाळा / कल्याण, ता. १७ (वार्ताहर) : गरीब, आदिवासी आणि कातकरी समाजातील मजूर महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर धरत श्रमजीवी संघटनेतर्फे सोमवारी (ता. १६) ठाणे व पालघर जिल्ह्यातील विविध तहसील कार्यालयांवर भव्य मोर्चा काढण्यात आला. रेशन दुकाने आणि अंगणवाडी केंद्रांमार्फत महिलांना दरमहा मोफत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून द्यावेत, अशी मुख्य मागणी या वेळी करण्यात आली.
आदिवासी आणि ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करणे परवडत नाही. परिणामी, मासिक पाळीच्या काळात अस्वच्छ कापडाचा वापर करावा लागतो. यामुळे संसर्गजन्य आजार, त्वचारोग आणि गर्भाशयाशी संबंधित गंभीर विकार जडत असल्याची चिंता संघटनेने व्यक्त केली आहे.
श्रमजीवी संघटनेच्या माजी कार्याध्यक्षा तथा वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला होता. शासनाने गरीब व आदिवासी महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅडची ठोस योजना राबवावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर हा जिल्हाव्यापी लढा उभारण्यात आला. मोर्चादरम्यान तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले. महिलांच्या आरोग्य आणि सन्मानासाठी काढण्यात आलेल्या या आंदोलनात ठाणे व पालघर जिल्ह्यातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
प्रमुख मागण्या
रेशन दुकाने आणि अंगणवाडी केंद्रांमार्फत सॅनिटरी नॅपकिनचा पुरवठा करावा.
प्रत्येक गरजू मुलगी व महिलेला दरमहा किमान १२ सॅनिटरी नॅपकिन मोफत द्यावेत.
अंत्योदय आणि प्राधान्य रेशनिंग कार्डधारक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.