उल्हासनगर, ता. १७ (वार्ताहर) : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे नुकताच एक हृदयस्पर्शी आणि अभिमानास्पद क्षण अनुभवायला मिळाला. तब्बल चार दशकांहून अधिक काळ भारतीय रेल्वेत निष्ठेने सेवा बजावणारे वरिष्ठ मोटरमन रामदास जगन्नाथ नारखेडे यांच्या निवृत्तीचा सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. सहकाऱ्यांनी फुलांनी सजविलेल्या लोकलमधून अंबरनाथ ते सीएसएमटी असा विशेष ‘निरोप प्रवास’ घेण्यात आला होता. या प्रवासादरम्यान मार्गातील प्रत्येक स्थानकावर उभ्या असलेल्या नागरिकांनी, प्रवाशांनी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी हात उंचावून केलेले अभिवादन पाहून नारखेडे भावूक झाले.
एका साध्या शेतकरी कुटुंबातून रेल्वे सेवेत उंच भरारी घेणाऱ्या या कर्तृत्ववान कर्मचाऱ्याला मिळालेला हा सन्मान अनेकांना भावुक करून गेला. नारखेडे यांच्या निवृत्तीचा समारंभ सीएसएमटी आणि कल्याण येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. रेल्वेतील अधिकारी, सहकारी कर्मचारी आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. विशेष म्हणजे अंबरनाथ ते सीएसएमटी दरम्यानची ही ‘निरोप यात्रा’ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या प्रवासासाठी लोकल रेल्वे फुलांनी आणि शुभेच्छा फलकांनी सजविली होती. मार्गातील विविध स्थानकांवर प्रवासासाठी उभे असलेले नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात नारखेडे यांचे स्वागत केले. आपल्या सेवेला मिळालेला हा सन्मान पाहून ते भारावून गेल्याचे दिसून आले. निवृत्तीच्या क्षणी आपल्या सेवाप्रवासाचा उल्लेख करताना नारखेडे म्हणाले, रेल्वेने मला आयुष्य दिले. या नोकरीमुळे कुटुंबाला स्थैर्य मिळाले आणि आई-वडिलांची चिंता दूर झाली.
सुरक्षित प्रवासाची सेवा
विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील आडविहीर या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबात नारखेडे यांचा जन्म झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. आई द्वारकाबाई आणि वडील जगन्नाथ नारखेडे यांनी मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. नातेवाइकांच्या मदतीने त्यांनी एसएससीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून आयटीआयचे प्रशिक्षण घेतले. २ डिसेंबर १९८५ मध्ये माटुंगा कार्यशाळेत त्यांनी रेल्वे सेवेत प्रवेश केला. त्यानंतर वरिष्ठ मोटरमन म्हणून त्यांनी अनेक वर्षे कार्य करत हजारो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सेवा दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.