धोकादायक वळणावर गतिरोधकाची मागणी
संत रोहिदास नगर-घाचियापाडा मार्गावर अपघाताची शक्यता
तारापुर, ता. १७ (बातमीदार) : डहाणू नगर परिषद हद्दीतील मसोली संत रोहिदास नगर ते घाचियापाडा या मार्गावर असलेल्या धोकादायक वळणांमुळे अपघाताची शक्यता असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित वळणांवर तातडीने गतिरोधक उभारावेत, अशी मागणी वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
संत रोहिदास नगर ते घाचियापाडा हा मार्ग परिसरातील महत्त्वाचा दळणवळणाचा रस्ता असून, दिवसभर दुचाकी व चारचाकी वाहनांची तसेच पादचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. मात्र, या मार्गावर सुमारे सात ते आठ ठिकाणी अचानक आणि तीव्र वळणे असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज वाहनचालकांना लागत नाही. ज्यामुळे समोरासमोर धडक होण्याचा किंवा पादचाऱ्यांना अपघात होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, या वळणांवर यापूर्वीही अनेक लहान-मोठे अपघात घडले असून, काही जण जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालक आणि पादचारी दोघांनाही सतर्क रहावे लागत आहे.
दरम्यान, रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी विजेचे तसेच पथदिव्यांचे लोखंडी खांब थेट वळणांवर उभारण्यात आले असल्याने वाहनचालकांना वळण घेताना अधिकच अडचण निर्माण होत आहे. वाहनांचा वेग अधिक असल्यास वाहन थेट या खांबांवर आदळण्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून संत रोहिदास नगर-घाचियापाडा मार्गावरील धोकादायक वळणांवर तातडीने गतिरोधक उभारावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वळणांवर गतिरोधक उभारल्यास वाहनांचा वेग आपोआप कमी होऊन अपघातांचा धोका कमी होईल आणि मोठी दुर्घटना टाळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
------------------
कोट
या रस्त्याच्या मुख्य वळनावरती अनेक अपघात झाले असून, त्यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून आम्ही पोलिस प्रशासनाला गतिरोधक बसवण्यासाठी निवेदन दिले आहे.
- लक्ष्मी तांबडा, स्थानिक ग्रामस्थ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.