जुईनगर, ता. १८ (बातमीदार) : कोकणचा हापूस आंबा बाजारात दाखल होऊ लागला असला तरी यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हा आंबा ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. वातावरणातील बदल, नैसर्गिक आपत्ती आणि कीडरोगामुळे कोकणातील हापूस आंब्याचे उत्पादन यावर्षी तब्बल ६० ते ७० टक्क्यांनी घटल्याची माहिती हापूस आंब्याचे घाऊक व्यापारी विजू बेंडे यांनी दिली.
मुंबई बाजार समिती घाऊक फळ बाजारात सध्या हापूस आंब्याची आवक सुरू झाली असून बाजारात सरासरी १७ हजार आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये कोकणातील हापूसच्या सुमारे सहा हजार ५०० पेट्या, तर कर्नाटक आणि केरळमधील सुमारे ११ हजार पेट्या आहेत. त्यामुळे यंदा बाजारात इतर राज्यांतील आंब्यांची आवक जास्त असून ग्राहकांना कोकण हापूसची वाट पाहावी लागणार आहे. उत्पादन घटल्यामुळे दरदेखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, कोकणातील हापूस आंब्याची एक पेटी सध्या १२ ते १५ हजार, तर कर्नाटकातील आंब्याची पेटी १० ते १२ हजार रुपये भावाने घाऊक बाजारात विक्री होत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आंब्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे सणाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी आतापासूनच खरेदी सुरू केली आहे; मात्र आवक कमी असल्याने यंदा भाव चढेच राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दुप्पट प्रमाणात भाव
सध्या बाजारात हापूस आंब्याचा भाव १,५०० ते चार हजार रुपये प्रतिडझन असून आंब्याचा आकार, वजन आणि दर्जा यानुसार भावात चढ-उतार होत आहेत. मागील वर्षी गुढीपाडव्याच्या काळात आवक जास्त असल्याने हापूस आंबा ७०० ते १,००० रुपये डझन भावाने उपलब्ध होता; मात्र यंदा उत्पादन घटल्यामुळे बाजारात दुप्पट प्रमाणात भाव वाढले आहेत.
बाजारात तीन वर्षांतील नीचांकी आवक
तुर्भे (बातमीदार) : उत्पादनात घट झाल्याने पाडव्याच्या मुहूर्तावर आंब्याची अपेक्षित आवक झाली नाही. त्यामुळे सोमवारी (ता. १६) एपीएमसी फळ बाजारात कोकणातील हापूसच्या ६,३२५ पेट्या, तर दक्षिण भारतातील १०,५२० पेट्यांची आवक झाली आहे. ही आवक बाजारातील मागील तीन वर्षातील नीचांकी आवक असून एप्रिलमध्ये वाढणार असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. दरवर्षी गुढीपाडव्याला ४० हजारांच्या वर हापूस आंब्याच्या पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होतात; मात्र यावर्षी पहिल्यांदाच गुढीपाडव्याला केवळ १६,८४५ आंब्याच्या पेट्यांची आवक झाली आहे. भावामध्ये गतवर्षीपेक्षा २० ते २५ टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.
गुढीपाडव्याला पेट्या दाखल
२०२३ ६५,०००
२०२४ ९५,०००
२०२५ ४०,३००
२०२६ १६,८४५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.