मुरबाड, ता. १७ (बातमीदार) : तालुक्यातील आसोळे ते खांडीची वाडी या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी (ता. १४) आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्याला मंजुरी मिळाली असून, या कामासाठी एक कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करण्यात येणार आहे.
मुरबाडपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आसोळे ग्रामपंचायत हद्दीत खांडीची वाडी आहे. या आदिवासी वाडीला आसोळे गावाशी जोडणारा अडीच किलोमीटरचा पक्का रस्ता नसल्यामुळे नागरिकांना अनेक वर्षे मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. कायमस्वरूपी पक्का रस्ता व्हावा, ही येथील आदिवासी बांधवांची जुनी मागणी होती. त्यासाठी ग्रामस्थांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच वाडीतील महिलांनी कविता निरगुडे हंबीर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदनही दिले होते.
खांडीची वाडी ते आसोळेदरम्यान सध्या दगड-मातीच्या कच्च्या रस्त्यावरून आदिवासी बांधवांना रोजगारासाठी तसेच भाजीपाला, कंदमुळे घेऊन मुरबाड किंवा कल्याण येथे जावे लागते. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आसोळे येथे पायी जावे लागत असल्याने शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
खांडीची वाडीची स्थिती
खांडीची वाडीमध्ये सुमारे ७० घरे असून जवळपास ४०० लोकसंख्या आहे. येथे चौथीपर्यंत शाळा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटूनही या वाडीला पक्का रस्ता उपलब्ध नव्हता. सध्या असलेला रस्ता कच्चा व अरुंद असल्याने दुचाकी वाहनेही जीव धोक्यात घालूनच वाडीत पोहोचतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.