प्रकाश पाटील : सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. १७ : गेल्या काही वर्षांमध्ये कृषी क्षेत्रामध्ये क्रांतिकारी बदल होत असल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान सुखकर होत आहे. बोर्डी येथील महिलांना सौरऊर्जाआधारित फळ, भाजीपाला प्रक्रिया प्रणालीला भारतीय पेटंट मिळविण्यात यश आले आहे. रुवान फूड टेक आरा ग्रीन या महिलांच्या स्टार्टअपच्या प्रयोगामुळे पालघर जिल्ह्यातील फळ, भाजीपाला उत्पादित शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा लाभ होणार आहे.
नैसर्गिक खाद्य उत्पादनांना शहरी भागात भरघोस मागणी आहे; परंतु ग्रामीण भागातील शेतकरी व महिलांना अन्नप्रक्रिया उद्योगाच्या नियमानुसार प्रक्रिया मूल्यवर्धन व विपणन करणे कठीण ठरते. तसेच इतर प्रक्रिया प्रणालीची किंमत, विजेची उपलब्धता व खर्च या समस्यांचा सामना करावा लागतो. या प्रश्नांवर मात करून विकसित केलेली ही प्रणाली महाराष्ट्रातील ५० हून अधिक शेतकऱ्यांना वरदान ठरली आहे. या प्रणालीच्या उपयोगामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत, वाया जाणाऱ्या शेतमालाचे जतन केले जाईल. तसेच नैसर्गिक व रसायनमुक्त उत्पादने, निर्यातीसाठी योग्य फळे असतील. तसेच या प्रणालीसाठी विजेची गरज नाही. वापरण्यास सोपे आणि देखभालीचा खर्च नाही. भारतातील शेतमाल प्रक्रियेला नवीन दिशा देण्यासाठी ही प्रणाली सज्ज आहे, अशी माहिती या स्टार्टअपच्या संस्थापिका विदुला पाटील, हिमाली वर्तक आणि प्रियांका राऊत यांनी दिली.
कार्यक्षमतेमध्ये तीन पट वाढ
या प्रणालीमध्ये ५० हून अधिक फळे, भाजी, पालेभाजी, औषधी वनस्पती, मासे आदींवर प्रयोग करण्यात आले आहेत. सुमारे तीन ते १२ तासांत हा शेतमाल उत्तमरीत्या सुकून १२ महिन्यांपर्यंत साठवणुकीस योग्य ठरत आहे. नैसर्गिक निर्जलीकरणाच्या तुलनेत ही पेटंट प्रक्रिया तीन पट अधिक कार्यक्षम ठरत आहे, असे सांगण्यात आले.
फळाचा रंग, चव कायम
चिकू फळप्रक्रिया व विपणनामध्ये या पेटंट पद्धतीने बनविलेल्या चिकू चिप्स आणि पावडरला बाजारपेठेत विशेष मागणी आहे, असे या प्रणालीचे संशोधक निनाद पाटील व निमिश राऊत यांनी सांगितले. आईस्क्रीम, कुल्फी, मिठाई, मिल्क शेक अशा अनेक उद्योगाला या प्रणालीने प्रक्रिया केलेला चिकू उपयुक्त ठरत आहे. प्रक्रिया केलेल्या फळाची गुणवत्ता रंग व चव उत्कृष्ट राहते. पौष्टिक, तसेच फायबरचे जतन होते व ग्राहकांना शुद्ध अन्न मिळते, असे ज्येष्ठ प्रक्रिया उद्योजिका लतिका पाटील यांनी सांगितले.
सुकेळीवर प्रयोग यशस्वी
ग्रामीण भागात होणारे हे संशोधन भारतीय अर्थव्यवस्थेला पुढे नेण्यास मोठा हातभार लावतील, असा विश्वास या पेटंटच्या सल्लागार प्राध्यापक डॉ. दीप्ती पाटील यांनी व्यक्त केला. सुकेळीवर केलेले प्रयोगदेखील यशस्वी ठरले आहेत. या प्रणालीने तीन ते चार दिवसांत सुकेळी तयार झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.