नंदिता देसाई यांच्या ‘द पेंटेड विंडो’ चित्रप्रदर्शनास सुरुवात
मुंबई, ता. १७ : कला क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार नंदिता देसाई यांच्या पाचव्या एकल चित्रप्रदर्शन ‘द पेंटेड विंडो’चे उद्घाटन नरीमन पॉइंट येथील कमलनयन बजाज कला दालनात उत्साहात पार पडले. कला क्युरेटर प्रफुल्ल सातोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रदर्शनाला कला रसिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
फिटनेसतज्ज्ञ नवाज मोदी सिंघानिया आणि आयएएस अधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी दोघांनीही नंदिता देसाई यांच्या कलाकृतींमधील भावविश्व, संकल्पना आणि त्यांच्या कलाप्रवासाबद्दल मनोगत व्यक्त केले. उद्घाटन सोहळ्यास रायल पदमसी, डॉ. अनिल काशी मुरारका, शेखर सावंत, कलाकार सत्येंद्र राणे, संगीता बाबानी, कला संग्राहक अजयकांत रुईया तसेच छायाचित्रकार हिमांशू सेठ यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. ‘द पेंटेड विंडो’ या प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना ‘खिडकी’ या प्रतीकाभोवती उभी आहे. आठवणी, आत्मपरीक्षण आणि भूतकाळाशी जोडणारा दुवा म्हणून खिडकीचा वापर या कलाकृतींमध्ये करण्यात आला आहे.
सुमारे ५० कलाकृतींमधून देसाई यांनी जुन्या, हस्तनिर्मित आणि पुनर्वापर केलेल्या लाकडी खिडक्यांचा वापर करून दैनंदिन वास्तू घटकांना कलात्मक रूप दिले आहे. सोडून दिलेल्या किंवा पाडण्यात आलेल्या घरांमधून मिळालेल्या खिडक्यांचा पुनर्वापर करून तयार केलेल्या या कलाकृतींमध्ये इतिहास, आठवणी आणि नव्या सुरुवातीची जाणीव व्यक्त होते. नंदिता देसाई यांच्या मते, बालपणी घर बदलण्याचे अनुभव आणि खिडकीजवळ बसताना मिळणारी शांतता यांमधून या प्रदर्शनाची कल्पना आकाराला आली. हे प्रदर्शन नरीमन पॉइंट येथील कमलनयन बजाज कला दालन, बजाज भवन येथे शनिवार (ता. २१)पर्यंत दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.