तुर्भे, ता. १७ (बातमीदार) : आखातातील युद्धाचा थेट परिणाम आता स्थानिक फळ बाजारावर दिसून येत आहे. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)तील फळ बाजारात परदेशी सफरचंदाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. मागील १५ ते १६ दिवसांपासून परदेशातून फळांची आयात जवळपास ठप्प झाल्याने बाजारातील पुरवठा कमी झाला आहे. परिणामी उपलब्ध असलेल्या साठवलेल्या सफरचंदाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
वाशी एपीएमसी फळ बाजारात नेहमीप्रमाणे देशी फळांसह परदेशी फळांची मोठ्या प्रमाणात आवक होते. आकर्षक रंग, आकार आणि चव यामुळे ग्राहकांमध्ये परदेशी फळांना विशेष मागणी असते. त्यातही सफरचंदाला सर्वाधिक मागणी असल्याने त्याच्या भावात झालेली वाढ ग्राहकांच्या खिशाला चटका लावत आहे. सध्या बाजारात टर्की, इराण, दक्षिण आफ्रिका, ग्रीस आणि पोलंड येथून यापूर्वी आयात करून शीतगृहात साठवून ठेवलेले सफरचंदच विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नव्या मालाची आवक बंद झाल्याने व्यापाऱ्यांकडील जुना साठा टप्प्याटप्प्याने बाजारात आणला जात आहे. यामुळे सफरचंदाचे भाव प्रतिकिलो २५० ते ४४० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
कृत्रिम तुटवड्याची स्थिती
व्यापाऱ्यांच्या मते, आयात पुन्हा सुरू होईपर्यंत भाव कमी होण्याची शक्यता कमी आहे. उलट साठा आणखी कमी झाल्यास दरात आणखी वाढ होऊ शकते. काही व्यापाऱ्यांनी साठा मर्यादित प्रमाणातच बाजारात सोडत असल्याने कृत्रिम तुटवडाही निर्माण होत असल्याची चर्चा बाजारात आहे.
भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर
दुसरीकडे, देशांतर्गत भाज्या आणि फळांचा पुरवठा सुरळीत असल्याने त्यांच्या भावात घट झाली आहे. त्यामुळे स्थानिक फळे स्वस्त असताना परदेशी सफरचंद मात्र महागल्याने ग्राहकांचा कल हळूहळू देशी पर्यायांकडे वळताना दिसत आहे.
परिस्थिती पूर्ववत होऊन आयात पुन्हा सुरू झाल्यास भावात स्थिरता येईल, अशी अपेक्षा व्यापारी आणि ग्राहक व्यक्त करत आहेत. तोपर्यंत परदेशी सफरचंद खरेदी करणे सर्वसामान्यांसाठी महागडे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.