वॉटर मेट्रोची तीन टप्प्यांत अंमलबजावणी
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
मुंबई, ता. १७ : मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) जलप्रवासी वाहतुकीसाठी प्रस्तावित वॉटर मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी तीन टप्प्यांत करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी शिपयार्ड उभारणीसाठी जागा निश्चित करण्यासह बोटींची बांधणी राज्यातच करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
विधान भवन येथे मंगळवारी (ता. १७) जलवाहतूक प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक पार पडली. या वेळी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, अपर मुख्य सचिव संजय सेठी, प्रधान सचिव अश्विनी भिडे, महाराष्ट्र सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप आदी उपस्थित होते. बैठकीत वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा आराखडा, जलमार्गांचे नियोजन, आवश्यक पायाभूत सुविधा तसेच बोटबांधणी क्षमतेबाबत सादरीकरण करण्यात आले. राज्यात विकसित होणाऱ्या शिपयार्ड सुविधांच्या माध्यमातून सुनियोजित विकास करताना गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ नये, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. जलप्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक बोटी राज्यातील शिपयार्डमध्येच बांधण्यात याव्यात. तसेच प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिपयार्ड उभारणीसाठी योग्य जागांची उपलब्धता निश्चित करून या प्रकल्पांना गती देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
---
वॉटर मेट्रोचा डीपीआर तयार!
दरम्यान, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी वॉटर मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाला असून तो सरकारला प्राप्त झाल्याची माहिती दिली. मुंबईत मेट्रोचे जाळे उभे राहिले, त्याच धर्तीवर एमएमआर परिसरात वॉटर मेट्रोचे जाळे उभारण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाला गती देण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
---
जलमार्ग विकासाचा आढावा
बैठकीत विविध जलमार्गांचा विकास, सागरी प्रवासी वाहतूक प्रकल्प तसेच बंदरे विकासासंदर्भातील योजनांचा आढावा घेण्यात आला. नांदगाव, दिघी आणि विजयदुर्ग येथे शिपयार्ड विकसित करण्याबाबत तसेच मुंबई महानगर प्रदेशात जलमार्ग कार्यान्वित करण्यासंदर्भात सादरीकरण करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.