ठाण्यातील आयव्हीएफ सेंटरची मान्यता रद्द
प्रशासनाची झाडाझडती, महापौरांचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : शहरातील एका प्रख्यात रुग्णालयात विनापरवाना सुरू असलेल्या आयव्हीएफ सेंटरमध्ये गैरप्रकार सुरू असल्याचे समोर आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने तत्काळ कारवाई करीत संबंधित सेंटरची मान्यता रद्द केली.
बदलापूर येथे उघडकीस आलेल्या स्त्रीबीज विक्री प्रकरणाचे धागेदोरे ठाण्यातही सापडल्याने शहरातील आयव्हीएफ व सोनोग्राफी केंद्रांवर मोठी कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत. ठाणे महापालिका प्रशासनाने या पार्श्वभूमीवर कडक भूमिका घेत सर्व आयव्हीएफ सेंटरची झाडाझडती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील एका प्रख्यात रुग्णालयात विनापरवाना सुरू असलेल्या आयव्हीएफ सेंटरमध्ये गैरप्रकार सुरू असल्याचे समोर आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने तत्काळ कारवाई करीत संबंधित सेंटरची मान्यता रद्द केली. तसेच तेथील तीन सोनोग्राफी मशिन्स सील करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी तातडीची बैठक घेत प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. या बैठकीस शिवसेना गटनेते पवन कदम तसेच मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील उपस्थित होते. बैठकीत उघड झालेल्या माहितीनुसार, गरीब महिलांना पैशांचे प्रलोभन दाखवून इंजेक्शनद्वारे गर्भात अधिक बीज तयार करण्यास भाग पाडले जात होते. त्यानंतर हे बीज काढून लाखो रुपयांना विकले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
मूल नसलेल्या जोडप्यांकडूनही मोठ्या प्रमाणात पैसे उकळून हा बेकायदा व्यवसाय सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.