आरएएमपी अंतर्गत विशेष प्रशिक्षण कार्यशाळा
पालघर, ता. १८ (बातमीदार) : तंत्रज्ञानामुळे विविध क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. त्याप्रमाणे अन्नप्रक्रिया उद्योगाच्या क्षेत्रातील क्षमता लक्षात घेता या क्षेत्रास शासकीय योजनांचे बळ उपलब्ध असून, अधिकाधिक व्यावसायिक, उद्योजकांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी ‘झेड प्रमाणीकरण’ प्रक्रियेबाबत विशेष जागरूकता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होते. डब्ल्यूएक्स कन्सल्टंट्स, जिल्हा उद्योग केंद्र आणि प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सोनोपंत दांडेकर कला, आपटे वाणिज्य आणि एम. एच. मेहता विज्ञान महाविद्यालय, पालघर आणि स्वयंशक्ती-स्त्री उद्यमी फाउंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित हा कार्यक्रम सोमवारी (ता. १६) पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस डब्ल्यूएक्स कन्सल्टंट्सच्या संचालिका आणि स्त्री उद्यमी फाउंडेशनच्या संस्थापिका दीपाली चांडक यांनी प्रास्ताविक केले. कार्यशाळा आयोजनामागील भूमिका विशद करताना त्यांनी तांत्रिक पाठबळ आणि स्व-मूल्यांकनाचे महत्त्व विषद केले. या प्रकारच्या कार्यशाळा उत्पादनाची गुणवत्ता वाढण्यासोबतच स्थानिक उद्योजकांनी जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी स्वतःच्या प्रक्रियांचे आधुनिकीकरण करण्यास मदत करतात.
कार्यक्रमात जनरल मॅनेजर, जिल्हा उद्योग केंद्र, उपेंद्र सांगळे म्हणाले की, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी उद्योजकांनी ‘झेड’ प्रमाणीकरण करणे काळाची गरज आहे.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे सब डिविजनल कृषी अधिकारी बर्वे म्हणाले की, महाराष्ट्रातील उद्योजकांना तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी शासन नेहमीच कटिबद्ध आहे. सूक्ष्म आणि लघु उद्योगांनी प्रक्रियेतील त्रुटी दूर करून जास्तीत जास्त कार्यक्षमता वाढविण्यासाठी आजची कार्यशाळा फायदेशीर ठरेल.
या कार्यशाळेत तज्ज्ञ ‘झेड’ प्रशिक्षक राजेश मसंद यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने स्व-मूल्यांकन, तांत्रिक लेखापरीक्षण आणि प्रक्रियांचे सुलभीकरण या विषयांवर सविस्तर सादरीकरण करण्यात आले. ५० हून अधिक उद्योजकांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या समारोपात सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे वाणिज्य विभागप्रमुख डॉ. मनिष देशमुख यांनी आभार मानले. ही कार्यशाळा घडवून येण्यासाठी तहसीलदार सचिन भालेराव, यांचे सहकार्य लाभले. विस्डमएक्स्टाच्या गौरी बैरागी यांनी सुत्रसंचालन केले आणि निखिलेश काळे, भरत शेंडगे, स्वाती देवरे, तिलक रोकेया यांच्या विशेष परिश्रमातून ही कार्यशाळा यशस्वी पार पडली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.