बालवर्ग पदवीदान समारंभ उत्साहात
मुंबई, ता. १८ ः एस. व्ही. एम. इंटरनॅशनल स्कूल, दादर येथे मंगळवारी (ता. १७) बालवर्ग पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लहानग्या विद्यार्थ्यांनी सुंदर पोषाख परिधान करून संगीत, नृत्य आणि नाटिका यांसारख्या विविध उपक्रमांमधून आपली कला सादर केली. उपस्थित सर्वांनी त्यांच्या सादरीकरणाचे मनापासून कौतुक केले.
शारदाश्रम विद्यामंदिर संस्थेचे सचिव तसेच एस.व्ही.एम. इंटरनॅशनल स्कूल समितीचे अध्यक्ष माननीय गजेंद्र शेट्टी हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी लहानग्या पदवीधरांचे कौतुक केले आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या मेहनतीचे अभिनंदन केले.
कार्यक्रमातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पदवीदान समारंभ. या समारंभासाठी प्री-प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी पदवीदानाचा पोषाख परिधान करून आत्मविश्वासाने मंचावर प्रवेश केला. मुख्याध्यापिका प्रीती साखळकर, प्रमुख पाहुणे शेट्टी यांनी विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले.