सोनखार-पाम बीच येथे सर्वात उंच गुढी
संयुक्त कुटुंबाचा संदेश देणार
नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी सानपाडा येथील सोनखार-पाम बीच परिसरात यंदा संयुक्त कुटुंब व्यवस्थेचा संदेश देणारी नवी मुंबईतील सर्वात उंच संकल्प गुढी उभारण्यात येणार आहे. हा उत्सव सेक्टर १६ मधील गुनीना मैदान येथे होणार आहे. नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत यांच्या हस्ते या गुढीची उभारणी करण्यात येणार आहे.
गुनीना मैदान येथे सकाळी ७ वाजता या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. संयुक्त कुटुंब या संकल्पनेला अधोरेखित करणारी ही गुढी या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. याशिवाय ढोल-ताशा पथक, लेझीम पथकांचे सादरीकरण, शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, भारतीय संस्कृतीची झलक दाखविणारी रांगोळी तसेच पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणारे स्थानिक नागरिक यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत येणार आहे.
उत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक नऊवारी साडी परिधान करून सहभागी होणाऱ्या महिलांना रोख रक्कम, भेटवस्तू आणि गिफ्ट व्हाऊचर देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच संत व महापुरुषांच्या वेशभूषेत सहभागी होणाऱ्या पुरुष व लहान मुलांनाही रोख पारितोषिक, भेटवस्तू आणि गिफ्ट व्हाऊचर देण्यात येणार आहेत.
नगरसेवक निशांत भगत व नगरसेविका प्रीती संदीप भगत यांच्या संयोजनाखाली नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळाच्या वतीने हा गुढीपाडवा सण साजरा करण्यात येणार आहे. यासाठी सोनखार (पाम बीच) ज्येष्ठ नागरिक सेवा समिती, सोनखार स्पोर्टस अँड कल्चरल असोसिएशन आणि सोनखार कराओके कलामंच यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.