वाशी विभागीय २४ व ४८ स्पीड पोस्ट सेवांना सुरुवात
कामोठे, ता. १८ (बातमीदार) : पोस्टाने तातडीच्या आणि वेळेवर वितरणाची गरज लक्षात घेऊन २४ स्पीड पोस्ट आणि ४८ स्पीड पोस्ट या प्रीमियम वेळबद्ध स्पीड पोस्ट सेवा सुरू केल्या आहेत. या सेवांची मंगळवारी (ता. १७) वाशी बिझनेस पोस्ट सेंटर येथून सुरुवात करण्यात आली. या सेवेचा लाभ नवी मुंबई, पनवेल आणि खोपोलीतील नागरिकांना घेता येणार आहे.
२४ स्पीड पोस्ट ही सेवा तातडीच्या व महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी पुढील दिवशी तर ४८ स्पीड पोस्ट ही सेवा व्यावसायिक व संस्थात्मक कागदपत्रांसाठी दोन दिवसांच्या आत हमीदार वितरण निश्चित करते.
या सेवांमध्ये विलंब झाल्यास मनी-बँक हमी, ओटीपी आधारित सुरक्षित वितरण, प्राधान्याने प्रक्रिया व हवाई वाहतूक, एसएमएस अलर्टसह रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि तातडीच्या लेखांसाठी सुविधा उपलब्ध आहेत.