मुंबई

मुंबई लोकलला ३ हजार कोटींचा आधार

CD

मुंबई लोकलला तीन हजार कोटींचा आधार
२३८ स्वयंचलित दरवाजांच्या नव्या गाड्या लवकरच; रेल्वेमंत्र्यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : ‘मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी केंद्र सरकार दरवर्षी सुमारे तीन हजार कोटी रुपयांचे अनुदान देत असून, त्यामुळे लोकलचे तिकीटदर नियंत्रणात राहत आहेत. परिणामी सर्वसामान्य प्रवाशांना परवडणाऱ्या दरात प्रवास करणे शक्य होत आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी २३८ स्वयंचलित दरवाजांच्या नव्या उपनगरीय लोकल गाड्या लवकरच सेवेत दाखल होणार आहेत,’ अशी माहिती मंगळवारी (ता. १७) रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिली.
मुंबईतील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन २३८ नवीन उपनगरीय लोकल गाड्यांची निर्मिती सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे दरवाजात उभे राहून प्रवास करणे आणि लोकलमधून प्रवासी पडण्याच्या घटना कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय या गाड्यांमध्ये सुधारित वायू व्यवस्था, आधुनिक ब्रेक प्रणाली तसेच प्रवाशांच्या सोयीच्या इतर सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. तसेच मुंबई, पुण्यासह देशातील ४८ शहरांमध्ये रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी विविध कामे सुरू असल्याचेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. यामध्ये नवीन फलाट, स्टेबलिंग लाइन्स, पिट लाइन्स, कोचिंग टर्मिनल्स आणि देखभाल सुविधा उभारल्या जात आहेत. या कामांमुळे भविष्यात अधिक गाड्या चालवणे शक्य होणार असून, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन नियोजन करण्यात येत आहे.

बुलेट ट्रेनमुळे मुंबई-पुणे अंतर कमी
बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मुंबई-पुणे या दोन्ही शहरांतील प्रवास अवघ्या ४८ मिनिटांत पूर्ण होऊ शकतो, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली. तसेच पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे या दोन शहरांमधील प्रवास सुमारे दोन तासांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत भारतातील पहिल्या समुद्राखालील बोगद्याचे काम सुरू असून, एकूण २१ किलोमीटर लांबीच्या सात बोगद्यांपैकी सुमारे पाच किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामही टप्प्याटप्प्याने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कुंभमेळ्यासाठी रेल्वेची तयारी
आगामी नाशिक कुंभमेळा लक्षात घेऊन रेल्वेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. नाशिक रोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकाणे या स्थानकांचा विकास करण्यात येत आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन १७ रोड ओव्हर ब्रिज आणि १९ भुयारी मार्गांची कामे सुरू आहेत. यामुळे कुंभमेळ्यादरम्यान वाहतूक अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

स्थानकांचे आधुनिकीकरण सुरूच
देशभरातील १,३०० रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम सध्या सुरू असून, त्यापैकी १८० स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे, तर सुमारे ५०० स्थानके अंतिम टप्प्यात आहेत. या कामांतर्गत प्रवाशांसाठी आधुनिक प्रतीक्षालय, सरकते जिने, उद्‍वाहन, स्वच्छता सुविधा आणि डिजिटल माहिती प्रणाली विकसित केल्या जात आहेत. तसेच ७५ स्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्रवासी थांबू शकतील असे आधुनिक ‘होल्डिंग एरिया’ उभारले जात आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवाशांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.

रेल्वेसाठी विक्रमी तरतूद
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७मध्ये भारतीय रेल्वेसाठी सुमारे २.७८ लाख कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. तसेच प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलतीमुळे प्रत्यक्षात सुमारे ४५ टक्के अनुदान दिले जात असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत सांगितले. त्यामुळे रेल्वे आजही सर्वसामान्यांसाठी स्वस्त आणि विश्वासार्ह प्रवासाचे साधन असल्याचे त्यांनी नमूद केले. रेल्वेतील या सर्व प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षांत मुंबई आणि महाराष्ट्रातील रेल्वे व्यवस्था अधिक सक्षम आणि प्रवासीकेंद्रित होईल, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

मी त्याचा बाप आहे... व्हायरल व्हिडीओमुळे होणाऱ्या टीकेवरून आस्ताद काळेचे वडील संतापले; म्हणाले- माजोरडा आहे म्हणता मग...

SCROLL FOR NEXT