जोशी रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक सक्तीच्या रजेवर?
भाईंदर, ता. १८ (बातमीदार) : भाईंदर पश्चिम येथील पं. भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात उंदराने महिला रुग्णाचा हात कुरतडल्याच्या धक्कादायक घटनेनंतर प्रशासनात हालचालींना वेग आला आहे. या प्रकरणात आधीच एक डॉक्टर आणि परिचारिकेला कार्यमुक्त करण्यात आले असताना आता रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जाफर तडवी १५ दिवसांच्या रजेवर गेल्याने चर्चांना उधाण आले आहे.
गंभीर अवस्थेतील सुहासिनी माठेकर या रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत्या. त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सोमवारी (ता. १६) पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या हाताला उंदराने कुरतडल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर संबंधित विभागातील डॉक्टर व परिचारिकेला तत्काळ कार्यमुक्त करून ठाणे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, उंदराच्या चाव्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी माठेकर यांचा मृत्यू झाला, ज्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले.
मंगळवारी (ता. १७) ठाण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर लगेचच डॉ. तडवी रजेवर गेल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या आदेशात जाफर यांनी सुट्टीची विनंती केल्याने रजा मंजूर करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे; मात्र उंदीर प्रकरणामुळे डॉ. जाफर यांना सुट्टीवर पाठविण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या जागी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्मिता आडे यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला असून, पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.