विभागप्रमुखांची
उपस्थिती अनिवार्य
स्थायी समिती अध्यक्षांचे पालिकेला निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक प्रश्नांची माहिती अतिरिक्त आयुक्तांकडे असतेच असे नाही. काही वेळा संबंधित विभागातील अधिकारी माहिती देतात. त्या त्या विभागाचे प्रमुख कधीच हजर नसतात. त्यामुळे सदस्यांना याेग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे विभागप्रमुखांना समितीच्या बैठकीत हजर राहणे सक्तीचे असल्याचे निर्देश समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले.
पालिकेच्या स्थायी समितीची बैठक दर आठवड्याच्या बुधवारी आयोजित करण्यात येते. या बैठकीत मुंबईकरांशी निगडित प्रश्न उपस्थित करण्यात येतात. स्थायी समिती अध्यक्षांच्या माध्यमातून प्रश्नांची उत्तरे मिळणे अपेक्षित असते. स्थायी समितीत विविध मुद्द्यांवर चर्चा होते आणि तीन ते चार तास चर्चा चालते. अशा वेळी समिती अध्यक्ष, सदस्य अतिरिक्त आयुक्त, पत्रकार सर्व असतात. संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित असतात; पण त्या-त्या विभागाचे प्रमुख उपस्थित नसल्याने अतिरिक्त आयुक्तांना पुढील बैठकीत माहिती देतो असे सांगावे लागते. असा मुद्दा स्थायी समिती सदस्य यामिनी जाधव यांनी उपस्थित केला. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन विभागप्रमुखांना बैठकीत हजर राहण्याचे आदेश द्यावेत, असे निर्देश प्रभाकर शिंदे यांनी पालिका प्रशासनाला दिले.