ठाण्यात पाणीटंचाईवरून महासभेत संताप
महापौरांकडून अधिकाऱ्यांची कान उघडणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध परिसरात होणाऱ्या अनियमित व रखडलेल्या पाणी टाकी यावरून महासभेत सदस्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या पाणी समस्येमुळे नागरिकांना मोठा फटका बसत असल्याचा मुद्दा सर्वपक्षीय नगरसेवकांनी जोरदारपणे उपस्थित केला. त्यानंतर संतापलेल्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी चार वर्षे आराम केला, आता कामाला लागा, असा इशारा देत, चुकीची व असमाधानकारक उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश त्यांनी दिले.
ठाणे शहरातील घोडबंदर रोड, मुंब्रा, दिवा आदी भागांत अनियमित पाणीपुरवठा आणि रखडलेल्या पाणी टाकी यांमुळे पालिकेकडून होत असलेल्या दिरंगाई बाबत नगरसेवक महासभेत आक्रमक झाल्याची दिसून आले. महासभेत शिवसेना नगरसेविका यज्ञा भोईर यांनी त्यांच्या प्रभागातील रखडलेल्या पाणीटाकीच्या कामाचा मुद्दा उपस्थित केला. यावर उपनगर अभियंता विनोद पवार यांनी पंधरा दिवसांत टाकीतून पाणीपुरवठा सुरू होईल, असे सांगितले. मात्र, याच प्रकारचे आश्वासन यापूर्वीही देण्यात आल्याचे निदर्शनास आणून देत भोईर यांनी नाराजी व्यक्त केली. मुंब्रा परिसरातील नगरसेवकांनीही पाणीटंचाईवर आवाज उठवत, वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरा पुरवठा होत असल्याचे सांगितले. भूमिपूजन होऊन चार वर्षे उलटूनही पाणीटाकीचे काम सुरू नसल्याची तक्रार करण्यात आली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गटनेते अभिजित पवार, विरोधी पक्षनेते शानू पठाण तसेच सभागृहनेते हणमंत जगदाळे यांनीही प्रशासनाला धारेवर धरत पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले.
अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश
नगरसेवकांच्या संतप्त भावना पाहता महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. तीन वर्षे आराम केला, आता कामाला लागा, असा इशारा देत चुकीची व असमाधानकारक उत्तरे देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश त्यांनी दिले. शहरातील पाणीप्रश्न तातडीने सोडवण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.