कल्याणमध्ये मराठी संस्कृतीचे दर्शन
हिंदू नववर्ष स्वागतयात्रेला जनसागराचा प्रतिसाद
कल्याण, ता. १९ (बातमीदार) : ‘जय श्रीराम’चा जयघोष, ढोल-ताशांचा निनाद आणि पारंपरिक वेशभूषेतील आबालवृद्धांचा उत्साह... अशा अत्यंत चैतन्यमयी वातावरणात ‘हिंदू नववर्ष स्वागतयात्रा समिती, कल्याण पूर्व’ तर्फे गुढीपाडव्यानिमित्त भव्य स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मराठी संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवणारी ही यात्रा कल्याण पूर्व विभागाचे मुख्य आकर्षण ठरली.
स्वागत यात्रेची सुरुवात श्री गणपती चौक, कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडा पटांगण येथून मोठ्या थाटामाटात झाली. मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या आणि पुष्पवृष्टीने स्वागत झाल्यानंतर तिसगाव येथील श्री तिसाई मंदिर प्रांगणात यात्रेची सांगता झाली.
यात्रेच्या स्वागताध्यक्षा आणि आमदार सुलभा गायकवाड यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ‘‘गुढीपाडवा हा आपल्या संस्कृतीचा मानबिंदू आहे. ही परंपरा जपत असतानाच, नवीन वर्षात कल्याण पूर्व विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊन विकासाचा नवा संकल्प आम्ही केला आहे.’’
विविध स्पर्धांनी वाढवली रंगत
यंदा केवळ मिरवणूकच नव्हे, तर विविध उपक्रमांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. नऊवारी साड्या आणि फेटा परिधान करून महिलांनी काढलेली बाइक रॅली आकर्षणाचे केंद्र ठरली. चिमुकल्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच मराठमोळ्या पेहरावात हजेरी लावली होती. सायकल रॅलीसोबतच तरुणाईसाठी ‘सोशल मीडिया व्हिडिओ रील्स’ स्पर्धा आणि लकी ड्रॉचेही आयोजन करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके आणि सन्मानपत्रे देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे संपूर्ण कल्याण पूर्व परिसर भक्ती आणि उत्साहाच्या रंगात न्हाऊन निघाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.