मुरबाड, ता. १९ (वार्ताहर) : चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात मराठी नववर्षारंभ ‘गुढीपाडवा’ मुरबाड शहरासह तालुक्यातील आदिवासी व ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक आणि ऐतिहासिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत करत सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. यंदा मुरबाड तालुक्यात एकूण ४५ हजार ६७७ गुढ्या उभारण्यात आल्याची नोंद आहे. प्रत्येक गावातील घराघरासमोर महिलावर्गांनी आकर्षक व सुंदर रांगोळ्या काढून नववर्षाचे स्वागत केले. पारंपरिक संस्कृतीचे जतन करत नागरिकांनी उत्साहाने सण साजरा केला. सकाळी ८ ते ९.३० या वेळेत सर्वत्र गुढी उभारण्याचे कार्यक्रम पार पडले. या निमित्ताने शहर व ग्रामीण भागात आनंद, उत्साह आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडले.