होस्पेट एक्स्प्रेसमध्ये मद्यधुंद प्रवाशाचा राडा
ठाणे रेल्वे पोलिसांकडून डोंबिवलीच्या तरुणाला अटक
ठाणे, ता. १९ : रेल्वे प्रवासादरम्यान दारूच्या नशेत सहप्रवाशांना त्रास देणे आणि कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे एका प्रवाशाला महागात पडले आहे. होस्पेट एक्स्प्रेसमध्ये धिंगाणा घालणाऱ्या प्रवीण बालाजी मसलगे (३१, रा. डोंबिवली पूर्व) याला ठाणे रेल्वे पोलिसांनी कर्जत स्थानकात ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
बुधवारी (१८ मार्च) रात्री ९:५३ च्या सुमारास गाडी क्रमांक १११३९ होस्पेट एक्स्प्रेस ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक ७ वर आली असता, बोगी क्रमांक ५४ मधील सीट क्रमांक ३७ वर बसलेला प्रवीण मसलगे हा शेजारील प्रवाशांशी मोठ्याने वाद घालत होता. मेल पेट्रोलिंगवर असलेले पोलिस शिपाई शुभम पाटील यांनी त्याची चौकशी केली असता, तो दारूच्या नशेत असल्याचे निदर्शनास आले.
रेल्वे तिकीट तपासनीस (टीसी) के. व्ही. चौधरी यांनी संबंधित प्रवाशाबाबत तक्रार दिल्यानंतर, पोलिसांनी गाडी कल्याण स्थानक सोडल्यानंतर पुढच्या कर्जत स्थानकात त्याला गाडीतून खाली उतरवून ताब्यात घेतले. आरोपीला कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तो दारूच्या नशेत असल्याचा वैद्यकीय अहवाल दिला. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. रेल्वे प्रवासात मद्यपान करून प्रवाशांना त्रास देणाऱ्यांविरुद्ध रेल्वे पोलिसांनी कडक इशारा दिला आहे.