पारसिक नगरमध्ये ज्येष्ठांचा गुढीपाडवा जल्लोष
‘निरोगी वर्षा’चा सामूहिक संकल्प
ठाणे, ता. १९ : एरवी सकाळच्या वेळेत फिरण्यासाठी एकत्र येणाऱ्या पारसिक नगरमधील ज्येष्ठ नागरिकांनी यंदा गुढीपाडवा आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करत सामाजिक एकोप्याचा आदर्श घालून दिला. सहकाऱ्यांसोबत सण साजरा करण्याचा निर्णय घेत या ज्येष्ठांनी एकमेकांना मिठाई भरवत नववर्षाचे स्वागत केले, तसेच वर्षभर निरोगी राहण्याचा सामूहिक संकल्प केला.
पारसिक नगरमधील ‘जोशी कट्टा’ हे ज्येष्ठ नागरिकांचे नेहमीचे भेटण्याचे ठिकाण. ज्येष्ठ साहित्यिक बाळ कांदलकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कट्ट्यावर दररोज मॉर्निंग वॉकनिमित्त ज्येष्ठ नागरिकांची हजेरी लागते. मात्र, हा कट्टा केवळ गप्पांचा नाही, तर वर्षभर विविध उपक्रमांनी गजबजलेला एक सामाजिक व्यासपीठ बनला आहे. प्रत्येक सदस्याचा वाढदिवस साजरा करण्यापासून ते सुख-दुःखांची देवाणघेवाण करण्यापर्यंत, या कट्ट्याने ‘एक कुटुंब’ अशी ओळख निर्माण केली आहे.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने गुरुवारी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ८२ वर्षीय रामदास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना मिठाईचे वाटप करण्यात आले. सामाजिक एकोपा वाढून सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि समाधान नांदावे, अशी भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पिटर फर्नांडिस यांनी पुढाकार घेत हा सण साजरा करण्याची संकल्पना मांडली. याप्रसंगी निवृत्त पोलिस अधिकारी जनार्दन थोरात, पारसिक बँकेचे माजी प्रबंधक राजन पवार यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.