वसई-विरार महासभेत राडा
बविआ-भाजप नगरसेवकांमध्ये सभागृहात धक्काबुक्की
नालासोपारा, ता. २० (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी बविआ आणि भाजपमध्ये जोरदार राडा झाला. या वेळी एकमेकांची कॉलर पकडत धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे. महापालिकेत सत्ता स्थापन झाल्यानंतर ३९ विषय घेऊन पहिलीच महासभा शुक्रवारी (ता. २०) झाली. यात बुलेट ट्रेनचा विषय येताच एकमेकांच्या नेत्यांच्या घोषणा देत असताना झालेल्या वादावादीचे रूपांतर धक्काबुक्कीत होऊन प्रचंड गोंधळ उडाला. शेवटी महापौर अजीव पाटील यांना खुर्ची सोडून मध्यस्थी करत वाद मिटवावा लागला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या महासभेच्या सुरुवातीला, मुदत संपलेली औषधे महापालिका रुग्णालय देत आहे, या मुद्द्यावर भाजपचे नगरसेवक अभय कक्कड आणि विशाल जाधव हे निषेधाचे बॅनर गळ्यात घालून सभागृहात बसले होते. महापौर अजीव पाटील यांनी या दोन्ही नगरसेवकांना चक्क तंबी देऊन बॅनर काढायला सांगितले आणि त्यानंतरच महासभेला सुरुवात झाली.
महासभेत बुलेट ट्रेनचा विषय पटलावर येताच भाजप नगरसेवकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. लगेच बविआ नगरसेवकांनी त्यांचे नेते हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. तेव्हा विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी तुमच्या नेत्याला जनतेने नाकारले आहे. हे वाक्य वापरताच बविआ नगरसेवक निषाद चोरघे आक्रमक होऊन भाजप नगरसेवकांच्या दिशेने धावले. त्यानंतर भाजप आणि बविआ या दोन्ही नागरसेवकांत सभागृहातच प्रचंड राडा झाला. एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली. शेवटी महापौर, उपमहापौर यांना आपली खुर्ची सोडून दोन्ही नागरसेवकांत मध्यस्थी करून वाद मिटवला.
---
भाजपचे नगरसेवक नवीन आहेत. त्यांना सभागृहाचे नियम माहीत नाहीत. तरीही आम्ही या महासभेतील गोंधळाचा विषय इथे सोडला आहे; पण यापुढे खपवून घेतले जाणार नाही. नियमानुसार कारवाई केली जाईल.
- अजीव पाटील, महापौर
---
अगोदर ते त्यांच्या नेत्यांचा महासभेत उदोउदो करत होते, तरीही आमचे नगरसेवक गप्प होते; पण संविधानिक पदावरील आमच्या नेत्यांच्या आम्ही शेवटी घोषणा दिल्या. त्यांना मिरची झोंबायची गरज नव्हती.
- मनोज पाटील, विरोधी पक्षनेता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.