मुंबई

कल्याण डोंबिवली महापालिकेचा ३ हजार १८६ कोटींचा अर्थसंकल्प

CD

शहर उभारणीचा निर्धार
कल्याण-डोंबिवली महापालिकेचा ३,१८६ कोटींचा अर्थसंकल्प सादर

कल्याण, ता. २१ (वार्ताहर) : नूतन महापालिकेच्या स्थापनेनंतर आणि लोकप्रतिनिधींच्या निवडीनंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे पहिले तीन हजार १८६ कोटी ६० लाखांचे मूळ अंदाजपत्रक आयुक्त अभिनव गोयल यांनी महासभेला शुक्रवारी (ता. २०) सादर केले. महापौर हर्षाली चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत उपमहापौर राहुल दामले यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे नवीन सभागृहाच्या पहिल्याच अर्थसंकल्पात कोणतीही थेट कर किंवा दरवाढ सुचवण्यात आलेली नाही.

डोंबिवलीकरांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कोपर पुलाला समांतर नवीन दुपदरी उड्डाणपूल बांधण्याची घोषणा केली आहे. प्रमुख प्रकल्पांची घोषणा आणि तरतुदी अर्थसंकल्पात केल्या आहेत. कल्याण पूर्व भागातील यू-टाईप रस्ता, श्री मलंग रोड, चेतना शाळा ते नेवाळी नाका आणि मांडा-टिटवाळा भागातील रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत. जुना कोपर उड्डाणपूल वाहतुकीस अपुरा पडत असल्याने तिथे नवीन दोन पदरी अतिरिक्त उड्डाणपूल बांधण्याचे प्रस्तावित आहे. मोठा गाव रेल्वे फाटक या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे. रस्त्यांचे काँक्रीटीकरण, कल्याण-डोंबिवलीत चार ठिकाणी ड्राय मिस्ट फाउंटन आणि स्मशानभूमींमध्ये एअर प्युरिफिकेशन सिस्टीम बसवली जाणार आहे. तसेच पालिका शालेय विद्यार्थ्यांना हिपॅटायटीस-ए लसीकरण आणि शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवणार आहे. बारावे येथील उद्यानात ऑटीझम व्हिलेज ही संकल्पना राबवली जाणार असून, शहरातील १५ लहान उद्यानांचे सुशोभीकरण केले जाईल.

पाणीपुरवठा आणि स्वच्छतेवर भर
फ्लो मीटर आणि स्कॅडा प्रणालीद्वारे पाणी नियंत्रणाचे नियोजन करण्यात येणार आहे. अमृत ३.० योजनेअंतर्गत २७ गावे, डोंबिवली पश्चिमेसाठी २७५ दशलक्ष लिटर क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र आणि वितरण व्यवस्था बळकट करणार आहे. तसेच शहरात नागरिकांसाठी २४ सेल्फ क्लीनिंग इको-टॉयलेट उभारली जातील.

घनकचरा व्यवस्थापन
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापनाची क्षमता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत. यामध्ये उंबर्डे येथे ७५० टीपीडी क्षमतेचा कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. तसेच बारावे येथे २०० टीपीडी क्षमतेचा बायो सीएनजी प्रकल्प आणि हॉर्टिकल्चर वेस्टसाठी ब्रिकेटिंग प्लांट कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. यासोबतच मांडा येथे बांधकाम व तोडकाम कचऱ्याच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठी स्वतंत्र प्रक्रिया केंद्र उभारले जाणार आहे.

खगोलशास्त्र क्लब स्थापन
महापालिका क्षेत्रातील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतुदी केल्या आहेत. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची ओढ निर्माण करण्यासाठी अत्याधुनिक टेलिस्कोप उपलब्ध करून देऊन ॲस्ट्रोनॉमी क्लब (खगोलशास्त्र क्लब) स्थापन करण्यात येणार आहे. तसेच बालवाड्यांना अधिक सुसज्ज करण्यासाठी आणि तिथे भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सामाजिक स्तरावर, तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या स्वयंरोजगारासाठी विविध प्रकारची प्रशिक्षणे आयोजित केली जाणार आहेत. यासोबतच शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा म्हणून १० मॉडेल कट्ट्यांची निर्मिती करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

अर्थसंकल्पातील महत्त्वाचे आकडे
एकूण जमा : ३,१८६.६० कोटी रुपये
एकूण खर्च : ३१८६.४९ कोटी रुपये
शिल्लक : १०.५१ लाख रुपये
महसुली खर्च : १,६५४.०८ कोटी रुपये
भांडवली खर्च : १,५२४.२० कोटी रुपये

उत्पन्नाचे स्रोत
मालमत्ता कर : ६००.०१ कोटी रुपये
जीएसटी व मुद्रांक शुल्क : ५१०.०३ कोटी रुपये
पाणीपट्टी : १०१ कोटी रुपये
म्युन्सिपल बाँड्स : विशेष प्रकल्पांसाठी खुल्या बाजारातून २०० कोटींचे कर्जरोखे उभारण्याचे प्रस्तावित
स्मार्ट पार्किंग व जाहिरात : २५ कोटींचे उत्पन्न अपेक्षित

शहराचा शाश्वत विकास आणि नागरिकांना देण्यात येणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधांचा दर्जा सुधारणे, यावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आला आहे. कोणताही अतिरिक्त भार न टाकता महसूल वाढवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
- अभिनव गोयल, आयुक्त, केडीएमसी

महाराष्ट्र महिला आयोगाच्या पुढील अध्यक्षा कोण? दोन दमदार महिला नेत्यांची नावे समोर, नव्या चेहऱ्यांबाबत मोठी माहिती समोर

IPL 2026 Marathi News: महेंद्रसिंग धोनी पूर्णपणे तंदुरुस्त नाही? Video ने वाढवली चिंता; इरफान म्हणाला तसा, ही Dhoniची शेवटची IPL

लग्नाच्या वेळी जितके पैसे खर्च केले ते केले नसते तर... अमृता खानविलकरचं वक्तव्य चर्चेत, म्हणते- हिमांशू आणि मी...

Kolhapur : जिल्हा परिषद विषय समिती फॉर्म्युला ठरला; शिवसेनेला बांधकाम- आरोग्य, तर जनसुराज्यला शिक्षण-अर्थ

तुंबाडची मंजुळा सिनेमा दिग्गज कलाकारांची मांदियाळी ! अनोखी कल्पना वापरत उलगडली कास्ट

SCROLL FOR NEXT