दुबे रुग्णालयाचे नूतनीकरण ठप्प!
अस्वच्छता, अपुऱ्या सुविधांमुळे रुग्ण-डॉक्टर त्रस्त
मोहिनी जाधव ः सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. २१ ः कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या दुबे रुग्णालयाचे नूतनीकरण गेल्या एक महिन्यापासून पूर्णपणे बंद पडल्याने बदलापूरकरांना नरकयातना सोसाव्या लागत आहेत. शहरातील ६० ते ७० टक्के सामान्य जनता या रुग्णालयावर अवलंबून असताना, अर्धवट कामामुळे निर्माण झालेली अस्वच्छता आणि जागेची कमतरता यामुळे रुग्णांसह डॉक्टरांचाही संयम सुटला आहे.
माजी मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी रुग्णालयाचे अद्ययावतीकरण करण्यासाठी सप्टेंबर २०२५ मध्ये निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात केली होती; मात्र डिसेंबरमधील पालिका निवडणुकांनंतर राजकीय समीकरणे बदलली. नव्या सत्ताधाऱ्यांनी २०० बेडच्या आधुनिक रुग्णालयाचा प्रस्ताव मांडत सध्याचे नूतनीकरण थांबवण्याचे आदेश दिले. यामुळे ठेकेदाराने काम थांबवले असून दरवाजे, खिडक्या आणि वीज उपकरणांशिवाय रुग्णालयाची अवस्था दयनीय झाली आहे.
दररोज १५० ते २०० रुग्णांची तपासणी एकाच डॉक्टरला अरुंद आणि कोंदट जागेत करावी लागत आहे. तसेच शौचालयांची दयनीय अवस्था असून गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात पाणीच उपलब्ध नसल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. दुबे रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम मागील एक महिन्यापासून पूर्णपणे ठप्प पडल्याने प्रशासकीय गोंधळाचा फटका थेट रुग्ण, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना बसत आहे. रुग्णालयात बसण्यासाठी, तपासणीसाठी पुरेशी जागा नसल्याने कोंदट आणि अस्वच्छ वातावरणात उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ६० ते ७० टक्के नागरिक आरोग्यसेवेसाठी याच रुग्णालयावर अवलंबून आहेत.
थकीत बिलामुळे काम थांबले?
दुबे रुग्णालयाच्या नूतनीकरणाचा निर्णय प्रशासकीय काळात मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी घेतला होता. सप्टेंबर २०२५ मध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली; मात्र डिसेंबरमधील पालिका निवडणुकांनंतर कामाचा वेग मंदावला. त्यानंतर नव्या सत्ताधाऱ्यांनी पहिल्याच सर्वसाधारण सभेत २०० खाटांच्या आधुनिक रुग्णालयाचा प्रस्ताव मांडत सुरू असलेले नूतनीकरण थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. या निर्णयामुळे बांधकाम विभागाने काम बंद करण्याचे आदेश दिले आणि थकीत बिलांमुळे ठेकेदाराने काम तत्काळ थांबवले.
ठेकेदाराकडून कामात दिरंगाई होत होती आणि तो बिलासाठी तगादा लावत होता. भविष्यात २०० बेडचे रुग्णालय उभारायचे असल्याने सध्याचे काम थांबवण्याचा निर्णय घेतला. लवकरच पाहणी करून पुढील निर्णय घेऊ.
- किरण भोईर, आरोग्य सभापती
रखडलेले काम पूर्ण करणे ही ठेकेदाराची जबाबदारी आहे. त्याला उद्यापासूनच काम सुरू करण्याचे आदेश दिले असून महिनाभरात काम पूर्ण करण्याचे आश्वासन त्याने दिले आहे.
- मारुती गायकवाड, मुख्याधिकारी, बदलापूर नगरपालिका
रुग्णांची तपासणी अत्यंत अरुंद जागेत करावी लागत असल्याने प्रभावी उपचार करणे कठीण झाले आहे. आम्ही मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी पाठपुरावा केला असून काम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे.
- डॉ. राजेश अंकुश, वैद्यकीय अधिकारी, दुबे रुग्णालय
मागील काही दिवसांपासून नागीण आजारावर उपचारासाठी रुग्णालयात येत आहे; मात्र नूतनीकरणाचे काम ठप्प असल्याने योग्य उपचार मिळण्यात अडचणी येत आहेत. उन्हामुळे अधिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे प्रशासनाने रुग्णालयाचे काम लवकर पूर्ण करून चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा आहे.
- विजयालक्ष्मी पिल्लई, रुग्ण
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.