तुर्भे, ता. २१ (बातमीदार) : नवी मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या गॅसटंचाईचा मोठा फटका छोट्या खाद्यव्यवसायांना बसत असून, इडली विक्रेत्यांवर याचा गंभीर परिणाम झाला आहे. गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याने अनेक इडली विक्रेत्यांना आपला व्यवसाय तात्पुरता बंद करून गावी परत जाण्याची वेळ आली आहे. नवी मुंबई शहरातील जवळपास शकडोहून अधिक इडली विक्रेते सिलिंडरअभावी गावी गेले.
शहरातील रस्त्यांवर, स्थानक परिसरात व गाव गावठाण, झोपडपट्टी भागात इडली-डोसा विक्री करणारे छोटे विक्रेते रोजच्या कमाईवर अवलंबून असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा खंडित झाल्याने त्यांचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. अनेक विक्रेत्यांना दोन-दोन आठवडे सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे सकाळी नाश्त्याचा मुख्य व्यवसाय असलेल्या इडली विक्रेत्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. काहींनी पर्याय म्हणून इलेक्ट्रिक शेगडी किंवा कोळशाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे शक्य होत नसल्याचे विक्रेते सांगतात.
दरम्यान, गॅसटंचाईमुळे अनेक हॉटेल्स आणि खाद्यव्यवसायांनीही मेन्यू कमी केला असून, काही ठिकाणी व्यवसाय बंद ठेवावा लागला आहे. इडली विक्रेत्यांनी सांगितले की, गॅस नाही, तर व्यवसाय नाही. रोजचा खर्च भागवणेही कठीण झाले आहे. त्यामुळे काही जण गावाकडे परतले असून, परिस्थिती सुधारल्यानंतरच पुन्हा व्यवसाय सुरू करण्याचा विचार आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने तातडीने व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, तसेच छोट्या विक्रेत्यांसाठी विशेष व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा शहरातील स्ट्रीट फूड व्यवसायावर मोठे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.