पनवेल, ता. २१ (बातमीदार) : महापालिकेतील प्रभाग समितीच्या सभापतींची निवड अद्याप बाकी असली तरी महापौर, स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती यांसह बहुतांश महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पूर्ण झाल्यानंतर शहराच्या राजकारणात नव्या समीकरणांची स्पष्ट चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे या नियुक्त्यांमध्ये पूर्वाश्रमीच्या शेतकरी कामगार पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांचा प्रभाव ठळकपणे दिसून येत आहे.
महापालिकेतील या पदवाटपामुळे भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये प्रतीक्षेची भावना निर्माण झाली असून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समर्थकांना अजून किमान एक ते सव्वा वर्षे संघटनात्मक संधीसाठी थांबावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांत पनवेल परिसरात शेकापची संघटनात्मक घसरण वेगाने झाली. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत या पक्षाचे २३ नगरसेवक निवडून आले होते; मात्र त्यापैकी बहुतांश जण नंतर भाजपमध्ये दाखल झाले. यामुळे स्थानिक सत्तेचा केंद्रबिंदू बदलला आणि भाजपने विरोधी पक्षातील प्रभावी स्थानिक नेतृत्व स्वतःकडे वळवले.
पनवेलमधील विविध घडामोडींमधून आमदार प्रशांत ठाकूर यांची स्थानिक राजकीय रचना अधिक व्यापक करण्याची रणनीती स्पष्ट दिसते. विरोधी पक्षातील प्रभावी नेतृत्व आपल्या छत्राखाली आणून सत्ता अधिक स्थिर करण्याचा प्रयत्न होत असला तरी याचवेळी जुन्या कार्यकर्त्यांमध्ये संधीच्या प्रतीक्षेची भावना वाढताना दिसत आहे. आगामी प्रभाग समिती सभापती निवडीकडे विशेष लक्ष लागले आहे.
आमदारांचा विश्वास
महापालिकेची पहिली निवडणूक होण्यापूर्वी नितीन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि नंतर आमदार ठाकूर यांचे विश्वासू सहकारी म्हणून पुढे आले. प्रभाग क्रमांक १८ मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळाली. सभागृहातील सक्रिय भूमिकेमुळे त्यांनी स्वतःचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण केले. पुढे त्यांच्याकडे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली. अखेरीस महापौरपदासाठी त्यांचे नाव निश्चित झाले होते, मात्र महापौरपद सर्वसाधारण आरक्षणात गेल्यानंतर त्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाले, हेही राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते.
स्थायी समितीची जबाबदारी
स्थायी समिती सभापतिपदावर बबन मुकादम यांची निवड हीदेखील त्याच मालिकेतील पुढची कडी मानली जाते. २०१७ मध्ये शेकापच्या तिकिटावर निवडून आलेले मुकादम नंतर भाजपमध्ये दाखल झाले. प्रभाग क्रमांक ८ मधून कमळ चिन्हावर त्यांनी विजय मिळवला. त्यांच्या पत्नी प्रिया या भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आहेत. महापालिकेच्या आर्थिक निर्णयांवर प्रभाव असलेल्या स्थायी समितीची जबाबदारी त्यांच्या हाती देणे हे स्पष्ट राजकीय संदेशवाहक ठरले आहे.
महिलांनाही संधी
महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी ममता म्हात्रे यांची निवडही त्याच पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरते. प्रीतम म्हात्रे विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये दाखल झाले आणि त्यांच्या समर्थकांपैकी अनेकांना नगरसेवक उमेदवारी मिळाली. त्यातून निर्माण झालेल्या गटशक्तीचे प्रतिबिंब या निवडीत दिसल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
स्वीकृत नगरसेवकपदावर बाजी
पूर्वी शेकापमध्ये पनवेल शहर जिल्हा चिटणीस म्हणून काम पाहिलेले आणि आता भाजपमध्ये सक्रिय असलेले गणेश कडू यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने केवळ पक्षांतरित नेत्यांना प्रवेशच दिला नाही तर सत्ताकारणातील निर्णायक स्तरावर स्थानही दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.