वेस्ट टू एनर्जी, सीबीजी प्रकल्पाविरोधात नागरिकांचे आंदोलन सुरू
तुर्भे, ता. २१ (बातमीदार) : नवी मुंबईतील तुर्भे परिसरात प्रस्तावित वेस्ट टू एनर्जी व सीबीजी (कंप्रेस्ड बायोगॅस) प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिकांनी आंदोलन सुरू केले आहे. हा प्रकल्प नवी मुंबई महापालिकेतर्फे तुर्भे येथील स्टोअर डम्पिंग ग्राउंडवर प्रस्तावित असून, या प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गुरुवारी (ता. १९) नागरिकांनी शिवसेना कार्यालयासमोर एकत्र येत शांततापूर्ण आंदोलन केले. या वेळी माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक सुरेश शिवाजी कुलकर्णी यांनी नागरिकांना आश्वासन दिले, की हा प्रकल्प रद्द करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. यासंदर्भात मनपा आयुक्त तसेच एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवण्यात आले असून, प्रकल्पाची सविस्तर माहिती नागरिकांसमोर मांडण्याची मागणी करण्यात आली आहे.
स्थानिकांच्या मते, या प्रकल्पातून निर्माण होणारा धूर व राख पर्यावरण व नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरू शकतो. तसेच अशा प्रकल्पांसाठी सुमारे ५०० मीटर बफर झोन आवश्यक असल्याने परिसरातील निवासी व पुनर्विकास प्रकल्पांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या नियमांनुसार अशा प्रकल्पांच्या परिसरात बांधकामांवर निर्बंध लागू शकतात.
दरम्यान, तुर्भे परिसरात सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेवरदेखील या प्रकल्पाचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, ज्यामुळे स्थानिक रहिवाशांच्या पुनर्वसन प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात. नागरिकांनी मागणी केली आहे, की प्रकल्पासंदर्भातील सर्व माहिती पारदर्शकपणे जाहीर करावी व पर्यावरणीय परिणामांचा सविस्तर अहवाल सादर करावा. तसेच हा प्रकल्प घनदाट वस्तीपासून दूर हलविण्याचा विचार करावा. नागरिकांनी इशारा दिला आहे, की आमच्या संबंधित मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास रस्ता रोको आंदोलन तसेच नवी मुंबई महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.