श्रीगुरू पादुका दर्शन सोहळा़
-----------
रिंगण, गौळण आणि हरिनामाने भारावले वातावरण
कुर्ला, खारघरच्या भजनी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग
मुंबई, ता. २१ : मुंबईतील एनएससीआय डोममध्ये सुरू असलेल्या ‘श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्या’त वारकरी महिलांनी भजन, रिंगण आणि हरिनामाच्या गजरातून भक्तीचा आविष्कार साकारला. कुर्ला व खारघर येथील मंडळांच्या सहभागामुळे सोहळा अधिकच रंगतदार आणि भक्तिमय झाला.
वरळी येथील एनएससीआय डोममध्ये सुरू असलेल्या ‘श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्या’त कुर्ला येथील वारकरी ज्ञानप्रसारक मंडळाच्या ३२ महिलांनी भक्तीचा सुरेल आविष्कार सादर करीत संपूर्ण परिसर भारावून टाकला. भजन, गौळण, रिंगण आणि हरिपाठाच्या पारंपरिक सादरीकरणातून त्यांनी वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा जिवंत केली.
तालबद्ध भजनांचे गोड सूर, गौळणीतून व्यक्त होणारी भक्तिभावना, रिंगणातील उत्साह आणि हरिपाठाचा गजर यामुळे सोहळ्यातील वातावरण पूर्णपणे भक्तिरसात न्हाऊन निघाले. या सादरीकरणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले आणि त्यांनी कार्यक्रमाचा मनापासून आनंद घेतला. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी सादर केलेल्या या कार्यक्रमामुळे सोहळ्याला विशेष आकर्षण प्राप्त झाले. संतांच्या पादुकांसमोर साकारलेल्या या भक्तिमय कार्यक्रमाने अनेकांना आत्मिक समाधानाचा अनुभव दिला. एकूणच या सादरीकरणातून भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
खारघर येथील श्रीराम हरिपाठ भजनी मंडळाच्या ४५ महिलांनीही सोहळ्यात सहभाग नोंदवत भक्तीचा अनोखा रंग भरला. रिंगण, हरिपाठ आणि भजनाच्या सादरीकरणाने वातावरण अधिकच भक्तिमय झाले. सुरेल भजन, हरिनामाचा गजर आणि तालबद्ध सादरीकरणामुळे भाविकही या भक्तीमय लयींमध्ये तल्लीन झाले. या वेळी मंडळाच्या पदाधिकारी ॲड. संतोषी कल्पेश चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, की या पावन सोहळ्यात सहभागी होण्याचा आम्हाला अत्यंत आनंद झाला. संतांच्या पादुकांचे दर्शन घेताना मनात अपार समाधान आणि शांतता लाभली. आमच्या मंडळातील महिलांना हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील. एकूणच या भजनी मंडळाच्या सहभागामुळे उत्सवात भक्ती, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.